
नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। चांदनी चौकचे भाजप खासदार आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येणारे लोक दिल्लीतील बाजारपेठांमध्ये खरेदीदेखील करतील आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही.
रविवारी जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले की, अशा प्रकारची वक्तव्ये करून राहुल गांधी यांनी दिल्लीतील व्यापाऱ्यांची थट्टा केली आहे. दिल्लीतील बाजारपेठांना ग्राहक हवे आहेत, राजकीय गर्दी नव्हे. राहुल गांधी यांची ही टिप्पणी दिल्लीतील व्यापारी वर्गाची क्रूर थट्टा करण्यासारखीच आहे.
ते म्हणाले की, व्यापारी वर्गाची उपजीविका ही काही राजकीय प्रयोगशाळा नाही, जिथे आधी बाजारपेठांमधील व्यापारावर परिणाम घडवून आणायचा आणि त्यानंतर रॅलीमध्ये सहभागी होणारी गर्दी खरेदी करून नुकसान भरून काढेल, असे सांगायचे. रॅलीमध्ये सहभागी होणारी व्यक्ती राजकीय उद्देशाने येते, खरेदी करण्यासाठी नाही. खंडेलवाल यांनी म्हटले की, दिल्लीतील व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांना राजकीय वक्तव्यांशी जोडले जाऊ नये. बाजारपेठांची खरी गरज म्हणजे ग्राहकांची नियमित वर्दळ आणि सुरळीत व्यापारी व्यवहार.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule