दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आदिवासी बांधवांसाठी शासन सदैव तत्पर -  आशिष शेलार
रायगड-अलिबाग, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। आईच्या निधनानंतर गेल्या १० ते १२ वर्षांत दिवाळीचा सण मनापासून गोड वाटला नव्हता. मात्र, कर्नाळा येथील कलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ घेताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आ
Drought-Affected Farmers


रायगड-अलिबाग, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। आईच्या निधनानंतर गेल्या १० ते १२ वर्षांत दिवाळीचा सण मनापासून गोड वाटला नव्हता. मात्र, कर्नाळा येथील कलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ घेताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेक वर्षांनंतर दिवाळीचा खरा आनंद अनुभवता आला, अशी भावुक व आपुलकीची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील कलेगाव येथे आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

मंत्री आशिष शेलार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत जमा केली आहे. तसेच, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी समाजाची लोककला, पारंपरिक नृत्य, गायन आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते जपण्याचे आवाहन करत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

आखाडवाडीत घरगुती फराळाचा आनंद व शेतीपूरक साहित्य वाटप...

दौऱ्याच्या मुख्य आकर्षण ठरलेल्या क्षणात मंत्री आशिष शेलार यांनी आखाडवाडी आदिवासी वाडीतील रोशन वाघमारे यांच्या घरी जाऊन सपरिवार दिवाळीच्या फराळाचा मनमोकळा आनंद घेतला. या स्नेहमेळाव्यात जिल्हा परिषदेच्या १५ टक्के निधीतून सात आदिवासी वाड्यांतील ३८९ कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य व लोककलेच्या सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह निर्माण केला. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट आणि शेतीची पाहणी केली.

या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समिती सभापती श्रीमती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, अविनाश कोळी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande