
पुणे, 10 नोव्हेंबर, (हिं.स.)। शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे या बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे भेट देणार आहेत. यावेळी त्या शेतकरी कुटुंबांसमवेत दिवाळी साजरी करणार असून, शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेणार आहेत.
या दौऱ्यात डॉ. गोऱ्हे या १९७२ मधील ऐतिहासिक मथुरा अत्याचार प्रकरणातील पीडित मथुराताई यांच्या निवासस्थानीही भेट देणार आहेत. मथुराताई व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करून त्यांची आस्थेने विचारपूस करणार आहेत.
डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी ११ डिसेंबर २०२५ रोजी मथुराताईंची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची, आर्थिक परिस्थितीची व पुनर्वसनाच्या प्रश्नांची माहिती घेतली होती. त्यावेळी घरकुल, वैद्यकीय उपचार, आर्थिक मदत आणि इतर शासकीय योजनांच्या लाभाबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
या पूर्वीच्या भेटीच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचेही डॉ. गोऱ्हे यांचे नियोजन आहे.
शेतकरी कुटुंबांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि महिला अत्याचार पीडितांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. गोऱ्हे या बुधवारी पहाटे पुण्याहून विमानाने नागपूर येथे पोहोचणार असून, तेथून मोटारीने नवरगाव येथे जाणार आहेत. दिवसभरातील नियोजित भेटी पूर्ण करून त्या रात्री नागपूरमार्गे पुण्याकडे परतणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर