
शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे सत्तांतर
राजेश पाटील यांना १६, तर शशिकांत चुयेकर यांना १३ मते
कोल्हापूर, १० नोव्हेंबर (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या चेअरमनपदी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक आणि माजी आमदार राजेश नरसिंग पाटील यांची बहुमताने निवड झाली. चेअरमनपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील यांना १६ मते मिळाली, तर काँग्रेस समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर यांना १३ मते मिळाली. शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने गोकुळ दूध संघावर महायुतीला सत्ता मिळवता आली.
गोकुळ दूध संघाच्या २५ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडून आले होते, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस समविचारी आघाडीकडे काठावरचे बहुमत होते. चेअरमन निवडीसाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक होती. मात्र, पहिल्या सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक अनुपस्थित राहिल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली होती.
या पेचातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांना चेअरमन निवडणुकीत मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश काढला. त्यानुसार गोकुळवर चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या या निर्णयाला काँग्रेस समविचारी आघाडीने विरोध केला. निषेध मोर्चा काढण्यासोबतच या निर्णयाला न्यायालयात आव्हानही देण्यात आले. मात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय महायुतीच्या बाजूने लागल्याने चेअरमन निवडीचा मार्ग मोकळा झाला.
या पार्श्वभूमीवर आज गोकुळ शिरगाव येथील संघाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा घेण्यात आली. निवडून आलेले २५ आणि शासननियुक्त चार असे एकूण २९ संचालक या सभेला उपस्थित होते. चेअरमनपदासाठी काँग्रेस समविचारी आघाडीकडून शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश नरसिंग पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
प्रत्यक्ष मतदानात राजेश पाटील यांना १६ मते, तर शशिकांत चुयेकर यांना १३ मते मिळाली. त्यामुळे राजेश पाटील यांची चेअरमनपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी जाहीर केले. प्रत्यक्ष संचालक निवडणुकीत १२ जागा मिळवलेल्या महायुतीला शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे चेअरमनपद मिळवता आले.
दरम्यान, शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस समविचारी आघाडीने आदल्या दिवशी संघर्ष मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनेही गोकुळ दूध संघाच्या परिसरात समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.
चेअरमन निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांची सभा झाली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात योग्य भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले. तसेच आमदार सतेज पाटील यांच्या विजयाच्या उन्मादाला उतरविल्याचे वक्तव्य केले. खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळ निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवून निवडणूक लढवण्यात आल्याचा आरोप केला आणि सत्याचा विजय झाल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह महायुतीचे संचालक, समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar