
लातूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय हे सामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी सध्या मोठा आधारवड ठरत आहे. राज्यावर असलेल्या दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांनी आपला मोर्चा आता खासगी रुग्णालयांकडून शासकीय रुग्णालयाकडे वळविला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांत येथील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत या रुग्णालयात दररोज सरासरी १६०० ते १७०० रुग्ण तपासणीसाठी येत होते. मात्र, आता ही संख्या २१०० ते २२०० पर्यंत पोहोचली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरूड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारांचा कोणताही मोठा प्रादुर्भाव नसतानाही रुग्णांची ही गर्दी वाढली आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि खासगी रुग्णालयांचा वाढता वैद्यकीय खर्च परवडणारा नसल्याने, सामान्य रुग्ण आता
उपचारांसाठी शासकीय रुग्णालयाला पहिली पसंती देत आहेत. वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या स्त्रीरोग, मेडिसिन आणि बालरोग विभागांतर्गत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णसंख्येचा हा ताण प्रसूती विभागातही स्पष्टपणे जाणवत आहे. मागील काळात या रुग्णालयात दररोज सरासरी ३० ते ३२ प्रसूती होत होत्या, परंतु आता हा आकडा ३५ ते ४० वर पोहोचला आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या रुग्णसंख्येवर थोडा मर्यादित परिणाम
असला, तरी आगामी काळात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता वैद्यकीय अधिक्षकांनी वर्तविली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis