व्यावसायिक यशाला अध्यात्माची आणि समाजसेवेची जोड!
हेअर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. प्रदीप सेठी यांच्याशी विशेष संवाद केसांच्या उपचारांतून व्यक्तीचा आत्मविश्वास फुलवणारे, शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्याचे स्वप्न पाहणारे आणि आध्यात्मिक विचारांतून समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण कर
डॉ. प्रदीप सेठी


* हेअर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. प्रदीप सेठी यांच्याशी विशेष संवाद

केसांच्या उपचारांतून व्यक्तीचा आत्मविश्वास फुलवणारे, शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्याचे स्वप्न पाहणारे आणि आध्यात्मिक विचारांतून समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. प्रदीप सेठी. हेअर ट्रान्सप्लांट क्षेत्रातील उल्लेखनीय कौशल्य, व्यावसायिक यशाची उत्तुंग भरारी आणि समाजाप्रती असलेली संवेदनशील बांधिलकी यांचा सुरेख संगम त्यांच्या कार्यातून अनुभवायला मिळतो. युजेनिक्स हेअर सायन्सेसचे (Eugenix Hair Sciences) सहसंस्थापक डॉ. प्रदीप सेठी यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांनी आध्यात्मिक मूल्यांची कास सोडलेली नाही. आपल्या जन्मभूमीतील ग्रामीण मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यापासून ते भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारण्यापर्यंत त्यांची स्वप्ने विस्तारत आहेत. व्यावसायिक महत्त्वाकांक्षेला आध्यात्मिकतेची जोड देत समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला त्यांचा प्रवास जिद्द, सेवाभाव आणि कर्मयोगाची प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या याच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा घेतलेला हा वेध...

प्रश्न १ : पुरुषांमध्ये टक्कल पडण्यामागील प्रमुख कारणे कोणती? केसगळतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तज्ज्ञांचा सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे?

डॉ. प्रदीप सेठी : पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे अँड्रोजेनेटिक अ‍ॅलोपेशिया (Androgenetic Alopecia). आनुवंशिकता आणि पुरुष संप्रेरकांचा प्रभाव यांमुळे ही समस्या निर्माण होते. या प्रक्रियेत केस अचानक गळून पडत नाहीत, तर हळूहळू त्यांची जाडी आणि मजबुती कमी होत जाते. जाड केस बारीक होतात, त्यांची वाढ खुंटते आणि केसांची मुळे कमकुवत होतात. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत 'मिनिएचरायझेशन' (Miniaturization) म्हणतात. कुटुंबात टक्कल पडण्याचा इतिहास असल्यास ही शक्यता अधिक असते. मात्र, केसगळती म्हणजे शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाची किंवा पोषणतत्त्वाची कमतरता, असा सरसकट निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये केसगळतीची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान होणे आवश्यक आहे. केस आणि टाळूच्या समस्यांमध्ये विशेष अनुभव असलेल्या पात्र त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

वैद्यकीय पदवी असणे आणि एखाद्या विशिष्ट उपचार पद्धतीत प्रत्यक्ष कौशल्य व दीर्घ अनुभव असणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वाहन चालवण्याचा परवाना असणे आणि प्रत्यक्ष रस्त्यावर कुशलतेने वाहन चालवता येणे, यातील फरक यावरून लक्षात येईल. त्याचप्रमाणे केसांच्या उपचारांसाठी वैद्यकीय पात्रतेबरोबरच अनुभव, सातत्यपूर्ण अभ्यास आणि विशेष कौशल्य आवश्यक असते. कोणत्या रुग्णाला कोणते औषध द्यावे, त्याचा कितपत फायदा होऊ शकतो, संभाव्य दुष्परिणाम कोणते आणि उपचारांमध्ये बदल कधी करावा, याचे योग्य मूल्यमापन अनुभवी डॉक्टर करू शकतात.

केसांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. एखादे झाड पूर्णपणे वाळून गेले आणि त्याचे जीवनच संपले, तर त्याला कितीही पाणी किंवा खत घातले तरी ते पुन्हा जिवंत होत नाही. त्याचप्रमाणे टक्कल पडण्याच्या काही प्रगत अवस्थांमध्ये केसांची मुळे कायमस्वरूपी नष्ट झालेली असू शकतात. अशा वेळी औषधोपचारांचा अपेक्षित फायदा मिळत नाही. संबंधित रुग्णांसाठी हेअर ट्रान्सप्लांट हा पर्याय ठरू शकतो. यामध्ये डोक्याच्या मागील किंवा बाजूच्या भागातील, तसेच निवडक परिस्थितीत दाढीतील केस वापरले जातात. मात्र, त्यासाठी योग्य नियोजन आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आवश्यक आहे. माझा सर्वांना सल्ला आहे की, केसगळती सुरू झाल्यावर जाहिरातींमधील आकर्षक आश्वासनांवर विश्वास ठेवण्याऐवजी डॉक्टरांची पात्रता, अनुभव आणि उपचारांची गुणवत्ता तपासा. आवश्यक असल्यास एकापेक्षा अधिक तज्ज्ञांचे मत घ्या. वेळीच निदान झाल्यास उपलब्ध उपचारांचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येतो. त्यामुळे टक्कल पडण्याची वाट न पाहता केस पातळ होण्याच्या सुरुवातीपासूनच जागरूक राहिले पाहिजे.

प्रश्न २ : हेअर ट्रान्सप्लांटची प्रक्रिया नेमकी कशी असते? उपचारानंतर रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी आणि अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी किती काळ लागतो?

डॉ. प्रदीप सेठी : कोणत्याही उपचाराची सुरुवात अचूक निदानापासून होते. रुग्णाला कोणत्या प्रकारची केसगळती आहे, टक्कल कोणत्या टप्प्यावर आहे, त्यामागील कारण काय आहे आणि प्रत्यारोपणासाठी पुरेसे डोनर हेअर उपलब्ध आहेत का, या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. प्रत्येक रुग्णाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज असतेच असे नाही. काहींना औषधोपचार पुरेसे ठरतात, तर काहींना प्रत्यारोपणासोबत औषधांचीही आवश्यकता असते. त्यामुळे उपचारांचे नियोजन वैयक्तिक परिस्थितीनुसार केले जाते.

प्रत्यारोपणासाठी लागणारा वेळही रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतो. टक्कल पडलेला भाग किती मोठा आहे, उपलब्ध डोनर हेअरची संख्या किती आहे आणि शरीराच्या इतर भागांतील केस वापरण्याची गरज आहे का, यानुसार कालावधी ठरतो. सामान्यतः लहान किंवा मध्यम क्षेत्रासाठी एक ते दीड दिवसांत प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. मोठ्या प्रमाणात टक्कल पडलेल्या रुग्णांना मात्र अनेक सत्रांची आवश्यकता भासू शकते. काही रुग्णांची प्रकरणे अत्यंत आव्हानात्मक असतात. उदाहरणार्थ, बोनी कपूर यांच्यासारख्या ग्रेड ७ प्रकारच्या प्रगत टक्कल असलेल्या रुग्णांवर आम्हाला टप्प्याटप्प्याने उपचार करावे लागले. अशा प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या सत्रांत अधिक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी एकच कालमर्यादा सांगता येत नाही. प्रत्यारोपणानंतरचे पहिले सात ते दहा दिवस विशेष काळजी घेण्याचे असतात. या काळात प्रत्यारोपित केसांची मुळे म्हणजेच ग्राफ्ट्स त्वचेमध्ये स्थिर होत असतात. त्यामुळे त्या भागाला हात लावणे, घासणे किंवा जोरात चोळणे टाळावे. डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांची स्वच्छता करावी. जड व्यायाम, अतिश्रम आणि पोहणे यापासून डॉक्टरांची परवानगी मिळेपर्यंत दूर राहावे. नियमित फॉलोअप घेणेही आवश्यक आहे. सामान्यतः रुग्ण दुसऱ्या दिवसापासून हलकी दैनंदिन कामे किंवा ऑफिसची कामे करू शकतात; मात्र हे प्रक्रियेच्या स्वरूपानुसार आणि रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरते.

प्रत्यारोपित केस लगेच वाढू लागतात असे नाही. सुरुवातीच्या काळात त्यांचे गळणे होऊ शकते. या प्रक्रियेला 'शॉक लॉस' (Shock Loss) म्हणतात. यामुळे घाबरण्याची गरज नसते, कारण केसांची मुळे त्वचेत राहून पुढे नवीन वाढ सुरू होऊ शकते. साधारणतः तीन ते चार महिन्यांनंतर नवीन केस दिसू लागतात. पाच ते आठ महिन्यांत वाढ अधिक स्पष्ट होते, तर नऊ ते बारा महिन्यांच्या आसपास बहुतांश रुग्णांना अपेक्षित परिणाम दिसू लागतात. काहींना अंतिम परिणामासाठी अधिक वेळ लागू शकतो. यामध्ये डॉक्टरांचे कौशल्य, योग्य रुग्णनिवड, प्रत्यारोपणाची पद्धत आणि संपूर्ण टीमचा अनुभव महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच ट्रान्सप्लांटनंतर केसगळती कायमची थांबते, असा समज करून घेऊ नये. प्रत्यारोपित केसांची वाढ सुरू राहू शकते; मात्र आजूबाजूचे नैसर्गिक केस वय, हार्मोन्स आणि आनुवंशिकतेमुळे पातळ होऊ शकतात. त्यामुळे प्रत्यारोपणानंतरही नियमित देखभाल आणि आवश्यक औषधोपचार महत्त्वाचे आहेत.

प्रश्न ३ : वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवतानाच आपण शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही मोठे काम उभे केले आहे. या कार्यामागील प्रेरणा काय?

डॉ. प्रदीप सेठी : माझ्या सामाजिक कार्यामागील सर्वांत मोठी प्रेरणा म्हणजे माझे गुरू परमहंस योगानंदजी यांची शिकवण. त्यांच्या विचारांचा एक महत्त्वाचा संदेश असा आहे की, ईश्वराला विसरून केवळ कामात गुंतून राहू नये आणि ईश्वरभक्तीच्या नावाखाली आपली कर्तव्येही दुर्लक्षित करू नयेत. व्यावसायिक जीवनात सर्वोत्तम कामगिरी करतानाच आध्यात्मिक जीवनही समृद्ध असले पाहिजे. आपण जे काम करतो, त्यामध्ये ईश्वराची प्रेरणा आणि ऊर्जा आहे, या भावनेतून काम केले पाहिजे. मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून गुरूजींची पुस्तके वाचू लागलो आणि ध्यानधारणा करू लागलो. ध्यानामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते, अंतःप्रेरणा जागृत होते आणि सर्जनशील विचारांना चालना मिळते. ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्यावरही परमहंस योगानंदजींच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी योगानंदजींचे पुस्तक 40 वेळा वाचल्याचे सांगितले जाते. त्यातून त्यांना प्रेरणा, एकाग्रता, साधेपणा आणि अंतर्ज्ञानाची जाणीव मिळाली. माझ्या मते, अशा आध्यात्मिक विचारांमुळेच व्यक्तीला आपल्या कामाकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहता येते. माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील एकाग्रता, निरीक्षणशक्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा विकसित होण्यातही गुरूजींच्या शिकवणीचा मोठा वाटा आहे. या विचारांतून मला व्यवसाय आणि समाजसेवा यांचा परस्परसंबंध समजला. व्यवसायात यशस्वी होणे, स्वतःच्या गरजा पूर्ण करणे आणि सहकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहेच; परंतु त्यापलीकडे जाऊन आपल्या प्रगतीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठीही केला पाहिजे. गरजू मुलांना शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. व्यावसायिक महत्त्वाकांक्षेला आध्यात्मिक उद्देशाची जोड देण्याच्या या विचाराला मी 'स्पिरिच्युअलायझिंग बिझनेस अ‍ॅम्बिशन' असे म्हणतो.

माझा जन्म ओडिशातील एका छोट्या गावात झाला. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत मी चप्पलही घातली नव्हती. चारचाकी वाहन पाहिल्याचेही त्या वयापर्यंत आठवत नाही. सायकल हेच बाहेरच्या जगाचे मोठे आकर्षण होते. त्या काळात माझी स्वप्नेही मर्यादित होती. दहावी-बारावीला चांगले गुण मिळवणे, शिक्षण पूर्ण करणे आणि एखादी नोकरी मिळवणे, एवढाच विचार होता. उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप किंवा इतर क्षेत्रांतील व्यापक संधींची मला कल्पनाही नव्हती. ईश्वराच्या कृपेने वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाली. दिल्लीतील एम्स आणि ऋषिकेश येथील अनुभवांनी माझे विश्व विस्तारले. पुढे जगभरातील रुग्ण आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींशी संपर्क आला. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, माणसाच्या आयुष्यात व्यापक जगाचा परिचय म्हणजेच 'एक्स्पोजर' अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण जे पाहतो, त्यापलीकडे जाण्याची स्वप्ने पाहू शकतो. संधींची ओळख झाली की विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्याची दिशाही बदलते. याच जाणिवेतून वयाच्या चाळीशीनंतर मी माझ्या जन्मभूमीतील शेतजमिनीवर ना-नफा तत्त्वावरील शाळा सुरू केली. आज या शाळेत सुमारे चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुमारे दीड ते दोन लाख चौरस फुटांच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. भुवनेश्वरपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात विशेषतः मुलींच्या शिक्षणाला आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे.

ग्रामीण भागातील मुली आता पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन मोठी स्वप्ने पाहत आहेत, ही माझ्यासाठी सर्वांत आनंदाची बाब आहे. गेल्या दोन वर्षांत आमच्या विद्यार्थिनींनी तायक्वांदो, तिरंदाजी, तसेच इंग्रजी आणि गणित विषयांतील ऑलिम्पियाडमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवली आहेत. ज्या मुलींच्या स्वप्नांना पूर्वी मर्यादा होत्या, त्या आज पत्रकार, व्यावसायिक, खेळाडू आणि उद्योजक होण्याची स्वप्ने पाहत आहेत. त्यांच्या विचारांमध्ये आणि आत्मविश्वासात झालेला बदल हीच आमच्या प्रयत्नांची खरी फलश्रुती आहे.

प्रश्न ४ : आपल्या शैक्षणिक संकल्पनेत केवळ पारंपरिक शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिसतो. या शिक्षणपद्धतीचे वैशिष्ट्य काय? तसेच भविष्यात कोणते शैक्षणिक प्रकल्प उभारण्याची योजना आहे?

डॉ. प्रदीप सेठी : समाजाला केवळ डॉक्टर, इंजिनिअर किंवा शास्त्रज्ञांचीच गरज नसते. उत्तम पत्रकार, कलाकार, संगीतकार, अभिनेते, खेळाडू, उद्योजक, राजकारणी आणि समाजसेवकही तितकेच आवश्यक आहेत. प्रत्येक मुलामध्ये वेगळी क्षमता असते. एखाद्या मुलीला संगीताची आवड आणि उत्तम जाण असेल, तर तिला त्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे. कदाचित भविष्यात ती लता मंगेशकर यांच्यासारखी महान गायिका होऊ शकेल. त्यामुळे आमच्या शाळेत केवळ पुस्तकी शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. क्रीडा, संगीत, नृत्य, नाटक आणि विविध कलांना समान स्थान आहे. विद्यार्थ्यांना हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांत नेऊन विविध क्षेत्रांचा प्रत्यक्ष परिचय करून दिला जातो. मोठे उद्योग, यशस्वी व्यक्ती आणि आधुनिक जग यांच्याशी त्यांची ओळख करून दिली जाते. कारण मोठी स्वप्ने पाहण्यासाठी व्यापक जग अनुभवणे आवश्यक आहे.

आमचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना केवळ पैसे कमावण्याचे शिक्षण देणे नाही. आयुष्य कसे जगायचे, जीवनाचा खरा उद्देश काय आणि समाजासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याची जाणीव त्यांच्यात निर्माण करायची आहे. वक्तशीरपणा, स्वच्छता, प्रामाणिकपणा, अचूकता, एकाग्रता आणि कामाप्रती निष्ठा ही मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग व्हावीत, यासाठी प्रयत्न असतो. आधुनिक जगातील व्यावसायिकता आणि भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक मूल्ये यांचा समतोल साधणारे शिक्षण आम्हाला द्यायचे आहे. याच संकल्पनेचा विस्तार म्हणून ऋषिकेशमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आणि सीबीएसई शिक्षणसंस्था उभारण्याची आमची योजना आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात ऋषिकेशमध्ये झाली असल्याने गंगामातेच्या परिसराशी माझे विशेष नाते आहे. जगभरातील विद्यार्थी तिथे येऊन आधुनिक शिक्षणाबरोबरच भारतीय आध्यात्मिक परंपरा, ध्यानधारणा आणि जीवनमूल्यांचा अनुभव घेतील, अशी आमची कल्पना आहे. विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास घडवणे हा या संस्थेचा मुख्य हेतू असेल.

महाराष्ट्राशीही माझे विशेष नाते आहे. मुंबई हे व्यावसायिकता, मेहनत, प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेला महत्त्व देणारे शहर आहे. त्यामुळे मुंबईच्या परिसरातही गुरूजींच्या विचारांवर आधारित शैक्षणिक प्रकल्प उभारण्याची इच्छा आहे. पुढील दोन-तीन वर्षांत लोणावळा-कर्जत परिसरात जमीन घेऊन अशा संस्थेच्या उभारणीच्या दिशेने काम करण्याची आमची योजना आहे.

प्रश्न ५ : आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि भौतिक प्रगतीच्या काळात आध्यात्मिकतेचे महत्त्व याकडे आपण कसे पाहता?

डॉ. प्रदीप सेठी : आज जग विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि संशोधनाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. मात्र, केवळ बुद्धिमत्ता, पैसा आणि भौतिक यश यांमुळे माणसाला संपूर्ण समाधान मिळतेच असे नाही. माझ्या मते, आधुनिक प्रगतीला आध्यात्मिकतेची जोड मिळाली तरच माणूस आपल्या क्षमतेचा अधिक व्यापक विकास करू शकतो. भारताने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे अध्यात्म आणि योगाचे तत्त्वज्ञान. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर आत्म्याचा परमात्म्याशी असलेला संबंध जाणून घेण्याचा मार्ग आहे. 'मी कोण आहे?', 'माझ्या जीवनाचा उद्देश काय?', 'खरे समाधान आणि शांती कशात आहे?' या मूलभूत प्रश्नांची उत्तरे भारतीय आध्यात्मिक परंपरेने जगाला दिली आहेत. आपण केवळ शरीर किंवा मन नसून आत्मा आहोत, ही जाणीव जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते.

बाह्य जगात यश मिळवण्याइतकेच अंतर्मनात शांतता आणि आनंद निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. परमहंस योगानंदजींच्या शिकवणीतून हाच संदेश मिळतो की, दैनंदिन जीवनातील प्रत्येक काम सर्वोत्तम पद्धतीने करा आणि त्याचवेळी ईश्वराशी असलेले नाते दृढ करा. आमच्या शैक्षणिक संस्थांमधून पुढील पिढीला या दोन्ही गोष्टींची शिकवण द्यायची आहे. जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि भारतीय आध्यात्मिक मूल्यांची जपणूक या दोन्हींचा समन्वय साधणे आवश्यक आहे.

प्रश्न ६ : आजच्या तरुण पिढीसाठी कोणता संदेश देऊ इच्छिता?

डॉ. प्रदीप सेठी : माझ्या संपूर्ण प्रवासाचा पाया गुरूजींची शिकवण आणि भारतीय सनातन आध्यात्मिक परंपरा हाच आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर असाल तर उत्तम डॉक्टर, पत्रकार असाल तर उत्तम पत्रकार आणि उद्योजक असाल तर उत्तम उद्योजक बनले पाहिजे. मात्र, या व्यावसायिक यशाबरोबरच अंतःकरणात ईश्वराविषयी भक्ती, समाजाविषयी प्रेम आणि जीवनाच्या व्यापक उद्देशाची जाणीवही असली पाहिजे.

आजच्या पिढीला दोन महत्त्वाच्या गोष्टी देण्याची गरज आहे. पहिली म्हणजे जागतिक दर्जाचे शिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता. दुसरी म्हणजे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक मूल्ये, ध्यानधारणा आणि जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी. भारतातील मुले जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवतील, पण त्याचवेळी आपल्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानही बाळगतील, असे माझे स्वप्न आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या मूळ मूल्यांपासून दूर जाण्याची गरज नाही. उलट, भारतीय परंपरेतील मूल्ये आणि आधुनिक जगातील ज्ञान यांचा संगम घडवला पाहिजे.

शेवटी, मला एवढेच सांगायचे आहे की, व्यवसायातून संपत्ती निर्माण करा, ज्ञानातून स्वतःची उंची वाढवा, अध्यात्मातून अंतर्मन समृद्ध करा आणि समाजसेवेतून आपल्या जीवनाला खरा अर्थ द्या. आपले यश केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता त्याचा उपयोग इतरांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी झाला पाहिजे. स्वतःच्या प्रगतीतून समाजाची प्रगती साधणे, हाच खऱ्या अर्थाने जीवनाचा कर्मयोग आहे. हेच माझ्या जीवनाचे ध्येय आणि पुढील पिढीसाठी माझा संदेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande