
मुंबई , 11 नोव्हेंबर (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून दरवर्षी घरांची सोडत काढली जाते. मात्र, मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या घरांबाबत गंभीर घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या परिसरातील अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या ११० सदनिकांवर बांगलादेशी घुसखोरांनी ताबा मिळवल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ११० सदनिकांसाठी मूळ अर्ज हिंदू नागरिकांच्या नावाने करण्यात आले होते. मात्र, सदनिकांचे मुखत्यारपत्रधारक आणि प्रत्यक्ष लाभार्थी हे बांगलादेशी मुस्लिम घुसखोर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे पुरावे म्हाडा प्रशासन आणि संबंधित मंत्र्यांकडे सादर करून सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात काही सदनिकाधारकांची मूळ नावे आणि सध्या त्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची नावेही सोमय्या यांनी उघड केली आहेत.
दरम्यान, नूरबाजार परिसरातील म्हाडाच्या अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५० हून अधिक रहिवाशांनी मुलुंड पूर्व येथील नीलम नगरमधील सोमय्या यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. परिसरात अतिक्रमण, घुसखोरी, बेकायदेशीर व्यवहार, गुंडगिरी आणि बनावट मालकी व्यवहारांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
या समस्यांची माहिती घेतल्यानंतर सोमय्या यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोईर यांना पत्र लिहून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. म्हाडामधील काही भ्रष्ट अधिकारी, एजंट आणि घुसखोर यांच्या संगनमतातून सर्वसामान्यांसाठी उभारलेल्या सरकारी गृहनिर्माण योजनेचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हिंदू नागरिकांच्या नावाने मंजूर झालेल्या सदनिकांवर अन्य व्यक्तींनी ताबा मिळवल्याची अनेक उदाहरणेही सोमय्या यांनी समोर आणली आहेत. अविनाश रविधोने यांच्या नावावर मंजूर झालेल्या सदनिकेत मन्सुरी जुनेद मोहम्मद याने वास्तव्य सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे रमेश घाटाळ, श्याम रौतेकर, मनोज खांबे, श्याम गायकवाड, निर्मला बर्वे, विनायक कुंभार, देविदास माने, कन्हैयाप्रसाद, इंदुबाई पवार आणि बाळू कडू यांच्या नावावर असलेल्या सदनिकांवरही अनुक्रमे शकील अहमद सिद्दिकी, नसरीन रमजान शेख, मुनीरा रिझवान, रिझवान मोहम्मद हुसेन, साजिद अली कादिर अब्दुल बाते, मुजम्मिल शेख, अन्सारी हाफिजूर, मोहम्मद जहांगीर शेख, मोहम्मद सिद्दिकी शेख आणि खान सद्दाम हुसेन यांनी ताबा मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणात लॉटरी प्रक्रियेनंतर बेनामी किंवा अनधिकृत लाभार्थ्यांकडे सदनिकांचे हस्तांतरण, मोठ्या प्रमाणावर जमिनीवर अतिक्रमण आणि ‘लँड जिहाद’सदृश प्रकार सुरू असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. स्वप्नपूर्ती सोसायटीतील ४१ सदनिकांमध्ये मूळ पात्र लाभार्थ्यांऐवजी बांगलादेशी मुस्लिम घुसखोर राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, जवळच्या बंगालीपुरा परिसरात अशा घटकांची उपस्थिती वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अँटॉप हिल परिसरात जाणार असल्याचेही सोमय्या यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, या आरोपांमुळे म्हाडाच्या घरवाटप प्रक्रियेतील पारदर्शकता, लाभार्थ्यांची पडताळणी आणि सदनिकांच्या प्रत्यक्ष वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची अधिकृत चौकशीतून पुष्टी होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे म्हाडा प्रशासनाच्या चौकशीतून या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule