
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.) - देश 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाच्या प्रत्येक भागाचा आणि समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक आहे. एकलव्य आदर्श निवासी शाळा आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार शिक्षणच देत नाहीत, तर त्यांच्या बहुआयामी कलागुणांना वाव देण्याची संधीही उपलब्ध करून देत आहेत. आपल्या देशात प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही. विद्यार्थ्यांना फक्त योग्य संधी, पोषक वातावरण आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये मुले आणि मुलींचे गुणोत्तर समान असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने देशाच्या प्रगतीची ही साक्ष असल्याचे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 नोव्हेंबर 2026) राष्ट्रपती भवनात एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गटाशी संवाद साधला. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केल्या जाणाऱ्या आदिवासी गौरव पंधरवड्याचा भाग म्हणून आदिवासी व्यवहार मंत्रालयामार्फत या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवण्याचे आणि समर्पण, शिस्त व आत्मविश्वासाने आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शिक्षण हे केवळ स्वतःची उपजीविका भागवण्याचे साधन नसावे, तर आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हेदेखील त्यांचे ध्येय असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. जेव्हा आपला युवक रोजगार निर्माता बनेल, तेव्हा देशाच्या सर्वसमावेशक विकासाला अधिक गती मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी आणि देश व जगात होणाऱ्या बदलांची चांगली माहिती ठेवावी, अशी सूचना राष्ट्रपतींनी केली. यामुळे त्यांच्यात तार्किक विचार आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. जेव्हा ते आपल्या गावी जातील, तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना चालू घडामोडींचे ज्ञान आणि सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती द्यावी, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या अशा प्रयत्नांमुळे त्यांच्या कुटुंबाला आणि समाजाला फायदा होईल आणि त्यांच्या शिक्षणालाही अधिक मोठा अर्थ आणि उद्देश प्राप्त होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी