मध्यरात्रीपासून सीएनजी महागला; वाहनधारकांच्या खर्चात वाढ
रायगड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता सीएनजी दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपये ५० पैशांची वाढ केली असून, १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर ल
CNG-prices-hiked-from-midnight


रायगड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)। महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता सीएनजी दरवाढीचा अतिरिक्त भार पडणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपये ५० पैशांची वाढ केली असून, १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर ९१.५० रुपये प्रति किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढ, पश्चिम आशियातील तणाव आणि देशांतर्गत गॅस पुरवठ्यातील कपात यामुळे आयात गॅसवरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी गॅस खरेदीचा खर्च वाढल्याने दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.

या दरवाढीचा सर्वाधिक फटका रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसण्याची शक्यता आहे. इंधनावरील खर्च वाढल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार असून, प्रवासी भाडेवाढीची मागणीही जोर धरू शकते. खासगी वाहनधारकांनाही आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतही सीएनजी व घरगुती पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजीचा दर ९९ रुपये, तर पीएनजीचा दर ५३ रुपये प्रति घनमीटर झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजी ९९.७५ रुपये, तर पीएनजी ५१.७५ रुपये प्रति घनमीटर झाला आहे.

इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि दैनंदिन खर्चात सातत्याने वाढ होत असताना झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande