
रायगड, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांनी माणगाव येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जहरी टीका केली. तटकरे कुटुंबाच्या राजकीय कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी, जन्माला येतानाच गेलं असतं, तर वारभर कपड्यात गेलं असतं, अशा बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत माणगावमधील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना दळवी म्हणाले, आमचा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध नाही, तर तटकरे कुटुंबाला विरोध आहे आणि तो कायम राहील. तटकरे यांनी राजकीय गुरूंनाही फसविल्याचा आरोप करत त्यांनी कुटुंबातील व्यक्तींनाच राजकीय पदे दिली जात असल्याची टीका केली.
दोन वर्षांपूर्वी राजकीय समीकरणे बदलली नसती, तर सुनील तटकरे खासदार झाले नसते, असा दावा करत आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचा निर्धारही दळवींनी व्यक्त केला. माणगावमधून सुरू झालेली पक्षप्रवेशाची प्रक्रिया श्रीवर्धन आणि म्हसळ्यापर्यंत सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, पालकमंत्री भरत गोगावले यांनाही दळवींनी अप्रत्यक्षपणे सुनावले. तुमच्या भोळेपणाचा फायदा घेणारी मंडळी रायगडमध्ये आहेत. तटकरे यांच्या भेटीला उघडपणे जाऊ नका. तुम्ही त्यांच्या भेटीला गेलात की शिवसैनिकांचे रक्त खवळते, असे ते म्हणाले.
या वक्तव्यांमुळे महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या राजकारणात नव्या वादाची चिन्हे दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)