रत्नागिरी : मार्लेश्वरमधील बालिकेच्या अपघाती मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक
रत्नागिरी 14 नोव्हेंबर (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून काल (दि. १३ नोव्हेंबर) चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार अ
रत्नागिरी : मार्लेश्वरमधील बालिकेच्या अपघाती मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक


रत्नागिरी 14 नोव्हेंबर (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून काल (दि. १३ नोव्हेंबर) चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाळवा (जि. सांगली) येथील प्रदीप लक्ष्मण पाटील आणि त्यांचे कुटुंबीय काल मार्लेश्वर येथे पर्यटनासाठी आले होते. मार्लेश्वरचे दर्शन झाल्यानंतर ही सारी मंडळी तेथून दत्तमंदिराकडे जाणारे पायऱ्या उतरून नदीमध्ये थोडावेळ खेळून पुन्हा मूळ देवस्थानाकडे नदीच्या बाजूने निघाले होते. त्यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास डोंगरावरून अचानक काही दगड खाली आले. त्यातील एक दगड श्री. पाटील आणि त्यांची पुतणी ऋत्वी संदीप पाटील हिला लागला. ऋत्वीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला दगड लागून ती खाली पडली आणि रक्तस्राव झाला. तिच्यावर निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अधिक उपचारांकरिता तिला देवरूखच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासंदर्भात आज देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद सावंत, शिवसेना (शिंदे गट) उपतालुकाप्रमुख सचिन मांगले, माजी उपसभापती छोट्या गावणकर, नगरसेवक बाळा कामेरकर, निदा कापडी, बाळा माने, सामाजिक कार्यकर्ते निखिल कोळवणकर, आकाश भोपळे यांच्यासह शंभरहून अधिक ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या फूटब्रिजचे काम सध्या सुरू असून, या कामासाठी मंदिरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर नदीपात्रात ५० ते ६० सुरुंग स्फोट करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या स्फोटांमुळे डोंगरावरील खडक सैल होऊन दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ५ जानेवारी २०२६ रोजी देवरूख पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देऊन धोक्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान गुहेतील दगड कोसळून काही महिला भाविक जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर ३० एप्रिल २०२६ रोजी पुजारी आणि ग्रामस्थांनी देवरूख सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देऊन संभाव्य जीवितहानीबाबत चिंता व्यक्त केली होती.

वारंवार सूचना देऊनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वी दिलेल्या निवेदनांची वेळीच दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande