
लातूर, ०२ नोव्हेंबर (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात यंदा २०१५-१६ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, या संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. लातूरच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्ह्याला शासनमान्य आणि हक्काचे उजनीचे पाणी मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासन आणि शासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई व दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. यावेळी आ. निलंगेकर यांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीकडे लक्ष वेधत उजनीच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
लातूर जिल्ह्याला सातत्याने पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत आ. निलंगेकर म्हणाले की, जिल्ह्याची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाने लातूरला उजनीचे पाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्याला शासनमान्य आणि हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग निश्चित झाला असला, तरी प्रत्यक्षात यासाठी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. उजनीचे पाणी मिळविण्यासाठी प्रशासनाने सक्रिय प्रयत्न करणे आणि लोकप्रतिनिधींनीही सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
यंदा जिल्ह्यात निर्माण होणारी पाणीटंचाई २०१५-१६ पेक्षाही भीषण असण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच पाणी प्रकल्प कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी बचतीबाबत आवश्यक सूचना देऊन पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली. शासन आणि प्रशासनाने निर्णय घेण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जानेवारी-फेब्रुवारीत जनआक्रोशाची शक्यता
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर वेळीच ठोस निर्णय न झाल्यास जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करू शकतात, असा इशाराही आ. निलंगेकर यांनी दिला. संभाव्य जलसंकटाची तीव्रता लक्षात घेऊन शासन आणि प्रशासनाने लातूरला उजनीचे हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी बैठकीत केली.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis