
रायगड, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे विचार, रयतेच्या कल्याणाची भूमिका आणि गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेतर्फे ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्टीत घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा सोसायटीच्या आवारात गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून जपली जात आहे. याच परंपरेला व्यापक स्वरूप देत शिवरायांचे कार्य, स्वराज्याची संकल्पना आणि लोककल्याणकारी विचारांचा जागर करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी स्वतः तयार केलेल्या गड-दुर्गांच्या प्रतिकृतीचे छायाचित्र किंवा त्यासोबत सेल्फी काढून www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमात सहभागींच्या छायाचित्रांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांना आपल्या कल्पकतेतून शिवकालीन गड-किल्ल्यांचा वारसा जपण्याची संधी मिळणार आहे. गड-दुर्गांच्या संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच शिवरायांचे विचार आणि शौर्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रायगडकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : संकेतस्थळ : www.mahaamrut.org.in , रायगड जिल्हा व्यवस्थापक : ९११२२२८७५९, शैलेश मराठे : ९४२३८९२१८२ मंगेश ढेबे : ८१४९५५२१४३
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)