पक्षांतरविरोधी कायद्यात बदल करण्यासाठी याचिका, सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) - पक्षांतरविरोधी कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकार, विधी आयोग, कायदा व संसदीय कार्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाकडून उत
सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर (हिं.स.) - पक्षांतरविरोधी कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकार, विधी आयोग, कायदा व संसदीय कार्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने विधी आयोग तसेच कायदा व संसदीय कार्य मंत्रालयालाही नोटीस बजावली आहे.

ए. सेथू यांनी सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी बाजू मांडली. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा गैरवापर रोखण्यासाठी आणि अपात्रतेच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याचिकेत म्हटले आहे की, नेते अपात्र ठरण्यापासून वाचण्यासाठी आमदार किंवा खासदारपदाचा राजीनामा देतात. यामुळे निवडून आलेल्या सरकारांचे बहुमत धोक्यात येऊ शकते. खासदार आणि आमदारांच्या राजीनाम्यांवर तसेच अपात्रतेवर निश्चित कालमर्यादेत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेतला जावा. तसेच, त्रिशंकू विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहात फ्लोअर टेस्ट अनिवार्य करण्यात यावी. बहुमताचा निर्णय सभागृहाबाहेरील समर्थनपत्रांवर किंवा नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनावर आधारित नसावा. याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, एखाद्या खासदार किंवा आमदाराविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई सुरू असेल किंवा त्याची शक्यता असेल, तर त्याने राजीनामा दिल्यामुळे ही कारवाई थांबू नये. राजीनामा स्वेच्छेने देण्यात आला आहे की, कोणाच्या तरी दबावाखाली किंवा राजकीय फायद्यासाठी, याची अध्यक्षांनी चौकशी करावी. यासाठी वस्तुस्थितीच्या आधारावर कारणांसह आदेश द्यावा. तसेच, राजीनाम्यावरील निर्णयापेक्षा वेगळी अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निर्णय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande