कार्लोस अल्कारजने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत पहिले एटीपी फायनल्स विजेतेपद पटकावले
ट्युरिन (इटली), 23 नोव्हेंबर (हिं.स.)स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्कारजने पहिल्यांदाच एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले आहे. इटलीतील टुरिन येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-२, ७-६(७) असा प
कार्लोस अल्कारज


ट्युरिन (इटली), 23 नोव्हेंबर (हिं.स.)स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्कारजने पहिल्यांदाच एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले आहे. इटलीतील टुरिन येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-२, ७-६(७) असा पराभव केला. या विजयासह, अल्कारजने एकही सामना न गमावता आपली स्पर्धेतील वाटचाल पूर्ण केली.

अल्कारजने दोन तास आणि एक मिनिट चाललेल्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने दुसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये सलग तीन सेट पॉईंट्स वाचवून विजय मिळवला. हे त्याचे या हंगामातील सहावे आणि कारकिर्दीतील ३० वे विजेतेपद आहे. गेल्या वर्षी तो जॅनिक सिनरकडून अंतिम सामन्यात पराभूत होता, पण यावेळी त्याने विजेतेपद पटकावले.

अल्कारजने पहिला सेट ६-२ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये, झ्वेरेव्हने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि सामना टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्ये एके वेळी अल्काराझ ३-६ ने मागे होता. त्यानंतर त्याने पुढील सातपैकी सहा पॉईंट्स जिंकून विजेतेपद पटकावले.

झ्वेरेव्हविरुद्ध अंतिम सामन्यांमध्ये अल्काराझचा विक्रम आता ३-० असा आहे. त्याने या स्पर्धेत पहिल्यांदाच झ्वेरेव्हची सर्व्हिस ब्रेक केली. या विजयामुळे, जर्मन खेळाडूविरुद्धचा त्याचा एकूण हेड-टू-हेड रेकॉर्ड ८-६ असा सुधारला. इनडोअर स्पर्धेत झ्वेरेव्हविरुद्धचा हा त्याचा पहिलाच विजय होता.

एटीपी फायनल्सचे विजेतेपद जिंकणारा अल्कारज तिसरा स्पॅनिश टेनिसपटू ठरला. त्याच्या आधी, १९७६ मध्ये मॅन्युएल ओरान्टेसने आणि १९९८ मध्ये ॲलेक्स कोरेत्जाने हे विजेतेपद पटकावले होते. या विजयामुळे, अल्काराझ त्या निवडक टेनिसपटूंच्या गटात सामील झाला ज्यांनी चारही ग्रँडस्लॅम विजेतेपदे आणि वर्षाअखेरीस होणारी चॅम्पियनशिप जिंकली आहे.

त्याच्या आधी, आंद्रे आगासी, रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांनी हा पराक्रम केला आहे. अल्कारजने यावर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून करिअर ग्रँडस्लॅम देखील पूर्ण केले आणि असे करणारा तो सर्वात तरुण टेनिसपटू ठरला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande