
हवाई प्रवासाचा खर्च वाढला; विमान सेवा महागाईचा दर ३५.५२ टक्क्यांवर
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। देशातील सेवा क्षेत्रातील किमतींच्या स्थितीचे चित्र स्पष्ट करणाऱ्या सेवा उत्पादक किंमत निर्देशांकाची आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीची तात्पुरती आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, हवाई प्रवासी सेवा क्षेत्रातील वार्षिक महागाई दर ३५.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे विमान प्रवासाशी संबंधित सेवांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. दुसरीकडे, रोखे व्यवहार सेवा आणि बँकिंग सेवा क्षेत्रातील किंमत निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २५ नोव्हेंबर रोजी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीसाठीचा तात्पुरता सेवा उत्पादक किंमत निर्देशांक (एसपीपीआय) तसेच पहिल्या तिमाहीसाठीचा अंतिम निर्देशांक जाहीर केला. या निर्देशांकासाठी २०२२-२३ हे आधारभूत वर्ष निश्चित करण्यात आले आहे. देशातील सात प्रमुख सेवा क्षेत्रांतील किमतींमधील बदलांचा अभ्यास या माध्यमातून केला जातो.
हवाई प्रवासी सेवा क्षेत्रातील किंमत निर्देशांक दुसऱ्या तिमाहीत १२७.८ वर पोहोचला. पहिल्या तिमाहीत हा निर्देशांक १२६.४ होता. वार्षिक महागाई दरातही मोठी वाढ होऊन तो ३५.५२ टक्क्यांवर पोहोचला. मागील तिमाहीत हा दर ३१.९४ टक्के होता. त्यामुळे हवाई प्रवासी सेवा क्षेत्रात किमती वाढण्याचा वेग कायम असल्याचे दिसून येते.
दूरसंचार सेवा क्षेत्रातील किंमत निर्देशांक ११२.२ वर स्थिर राहिला. मात्र, या क्षेत्राचा वार्षिक महागाई दर पहिल्या तिमाहीतील ०.७२ टक्क्यांवरून दुसऱ्या तिमाहीत ०.५४ टक्क्यांवर आला. विमा सेवा क्षेत्राचा निर्देशांक १०२.९ वरून वाढून १०३.२ झाला. या क्षेत्रातील वार्षिक महागाई दर ०.९८ टक्क्यांवरून ०.४९ टक्क्यांवर घसरला.
बँकिंग सेवा क्षेत्रात किंमत निर्देशांक ९९.२ वरून किंचित वाढून ९९.५ झाला. मात्र, वार्षिक महागाई दर उणे ४.९८ टक्क्यांवरून उणे ३.९६ टक्क्यांवर आला. बँकिंग सेवा योगदान निर्देशांक १२९.४ वरून वाढून १३४.७ झाला. या क्षेत्रातील वार्षिक महागाई दर ३.८६ टक्के नोंदवण्यात आला. रोखे व्यवहार सेवा निर्देशांक ८९.९ वरून घसरून ८६.० वर आला. या क्षेत्रातील वार्षिक महागाई दर उणे ६.९३ टक्के राहिला.
रेल्वे सेवा क्षेत्राचा निर्देशांक १०३.४ वरून १०२.७ वर घसरला. मात्र, वार्षिक महागाई दर १.२७ टक्क्यांवरून वाढून १.३८ टक्के झाला. रेल्वे मालवाहतूक सेवांचा निर्देशांक १०३.३ वरून १०२.३ वर आला, तर प्रवासी सेवा निर्देशांक १०३.५ वर स्थिर राहिला. निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापन सेवा निर्देशांकही ११३.६ वरून १०९.५ वर घसरला.
दरम्यान, रोखे व्यवहार सेवा निर्देशांक सेबीकडून, तर बँकिंग सेवा निर्देशांक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून संकलित केला जातो. हवाई प्रवासी सेवा किंमत निर्देशांकासाठी २०२२-२३ हे भार निश्चित करण्याचे वर्ष आणि २०२५-२६ हा किंमत संदर्भ कालावधी वापरण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या तिसऱ्या तिमाहीचा सेवा उत्पादक किंमत निर्देशांक २४ फेब्रुवारी २०२७ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule