
- शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने; नियोजनबद्ध शहरीकरणावर भर देण्याचे आवाहन
- तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे ६५ टक्के असून, शहरे ही आर्थिक विकासाची इंजिने आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे ओझे म्हणून न पाहता विकासाची संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. त्यासाठी नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पायाभूत सुविधा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट राज्याने निश्चित केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथे आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेचे (वर्ल्ड मेयर्स फोरम) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या परिषदेस केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज पाठक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजकिशोर मोदी, यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक, लोकप्रतिनिधी आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भारतात पूर्वी शहरीकरणाला समस्या मानून ते रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शहरीकरण रोखता आले नाही आणि त्याचे योग्य नियोजनही झाले नाही. परिणामी अनियोजित शहरे, झोपडपट्ट्या, अपुऱ्या नागरी सुविधा, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या निर्माण झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याची भूमिका मांडली. त्यानंतर देशातील शहरी प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
मुंबई महानगर प्रदेशात ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ३०० किलोमीटरपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पांवर भर दिला जात आहे. शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी राहण्यायोग्य शहरे हे शहरी विकासाचे तीन महत्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तिसरी, चौथी मुंबई आकाराला येणार
महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचे चित्र मांडताना मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईच्या निर्मितीचा उल्लेख केला. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई विकसित करण्यात येत असून, या ‘तिसऱ्या मुंबई’मध्ये एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी विकसित करण्यात येत आहे. येथे शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, नवोपक्रम आणि जागतिक कंपन्यांच्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्ससाठी स्वतंत्र परिसंस्था उभारण्यात येणार आहे. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची क्षमता असलेली शैक्षणिक व्यवस्था आणि १२ जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी सात विद्यापीठांनी कामकाज सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्यात येत आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, ते जगातील दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुलेट ट्रेन आणि सुपर एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून या परिसराला मुंबईशी जोडण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ परिसरातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूमुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत सुमारे ४० मिनिटांत पोहोचता येते. पुढील वर्षी हा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण करता येईल. एकीकडे विद्यमान शहरांचे पुनरुज्जीवन आणि पुनर्विकास, तर दुसरीकडे नव्या शहरांची निर्मिती अशा दुहेरी धोरणातून राज्य नागरी विकासाला गती देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये मोठे परिवर्तन होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
गुंतवणुकीपेक्षा इच्छाशक्ती आणि नियोजन महत्त्वाचे
मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात शहरांचा वाटा ६५ टक्के आहे. महाराष्ट्राची ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सुमारे ४०० शहरांमध्ये, तर उर्वरित लोकसंख्या सुमारे ४० हजार गावांमध्ये राहते. त्यामुळे शहरांमध्ये उत्तम राहणीमान निर्माण करून राज्यातील निम्म्या लोकसंख्येच्या जीवनमानात सुधारणा करण्याची मोठी संधी आहे.
शहरांच्या विकासासाठी केवळ मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता नसते, तर त्यासाठी इच्छाशक्ती, ठाम निर्धार आणि योग्य नियोजन महत्वाचे असते. जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी भांडवल उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी व्यवहार्य आणि दर्जेदार प्रकल्प तयार ठेवणे आवश्यक आहे. प्रकल्पांचे योग्य नियोजन केल्यास गुंतवणूक आपोआप आकर्षित होते, असे फडणवीस यांनी नमूद केले.
धारावीचे रूपांतर नव्या व्यावसायिक केंद्रात
मुंबईतील जुन्या वस्त्या आणि इमारतींचे पुनरुज्जीवन, पुनर्विकास आणि नागरी परिवर्तन सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून तेथील रहिवाशांना सर्व सुविधांनी युक्त सन्मानजनक घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या मुंबईचे प्रमुख व्यावसायिक केंद्र असलेले बीकेसी भविष्यात धारावीच्या रूपाने आणखी एका महत्वाच्या व्यावसायिक केंद्राला जोडले जाईल. पुढील दहा वर्षांत धारावी हे मुंबईचे नवे व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर हे नागरिकांचे पहिले उत्तरदायी प्रतिनिधी
आपण स्वतः नागपूरचे महापौर म्हणून काम केले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजातील आव्हानांची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता किंवा अन्य नागरी सुविधांबाबत समस्या निर्माण झाल्यास ते सर्वप्रथम महापौर किंवा नगरसेवकांकडे अपेक्षेने पाहतात. त्यामुळे महापौरांचे काम अत्यंत आव्हानात्मक असून त्यांना चोवीस तास सज्ज राहावे लागते, असे ते म्हणाले.
प्रत्येक शहराने दुसऱ्या शहरातील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करावी. इंदूर, अहमदाबाद आणि मुंबई यांसारख्या शहरांतील चांगल्या कार्यपद्धतींचा इतर शहरांना उपयोग होऊ शकतो. प्रत्येक वेळी नव्याने प्रयोग करण्याऐवजी यशस्वी मॉडेलचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने शंभर वर्षांत शहरी प्रशासन, प्रशिक्षण, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी आणि धोरणनिर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. जागतिक महापौर परिषदेत होणाऱ्या चर्चांमधून आणि निष्कर्षांमधून मिळणाऱ्या सूचना महाराष्ट्र शासनाला सादर कराव्यात. त्यावर सकारात्मक विचार करून आवश्यक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी देशभरातील यशस्वी नागरी उपक्रम आणि उत्तम कार्यपद्धतींचे संकलन असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू व महापौर रितू तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. पाठक यांनी प्रस्ताविकात परिषदेच्या आयोजनाची भूमिका व संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी