
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत तीन महिन्यांनी वाढवून ३१ मार्च २०२७ पर्यंत केली आहे. यापूर्वी कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती.
परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) बुधवारी एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली. आयात केलेल्या कच्च्या साखरेचे पांढऱ्या किंवा परिष्कृत साखरेत रूपांतर करून तिची देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याची मुदतही वाढवून ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत करण्यात आली आहे. साखरेच्या देशांतर्गत किमतींमध्ये झालेली मोठी वाढ लक्षात घेऊन सरकारने शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती. २०२६-२७ च्या साखर हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा प्रारंभीचा साठा कमी असल्यामुळे साखर कारखान्यांकडून विकल्या जाणाऱ्या साखरेच्या किमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या होत्या.
देशातील प्रमुख सणांच्या काळात साधारणपणे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत साखरेची मागणी वाढते. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दर महिन्याला १० टनांपेक्षा अधिक साखरेचा वापर करणाऱ्या घाऊक ग्राहकांसाठी साठवणुकीची मर्यादाही निश्चित केली होती. त्यानुसार या ग्राहकांना केवळ १५ दिवसांच्या वापरापुरताच साखरेचा साठा ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule