यूएईमध्ये बस- ट्रकच्या धडकेत भारतीय नागरिकांसह १३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली , 25 नोव्हेंबर (हिं.स.)। दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) रास अल खैमाह येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आ
यूएईमध्ये बस- ट्रकची धडक होऊन भीषण अपघात; भारतीय नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश


नवी दिल्ली , 25 नोव्हेंबर (हिं.स.)। दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) रास अल खैमाह येथे बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. या अपघातात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.अपघाताबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, पीडितांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य देण्यासाठी भारतीय वाणिज्य दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे.

भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, रास अल खैमाह येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातामुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. या दुर्घटनेत भारतीय नागरिकांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. दूतावासाने मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्यांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य देण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे. या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ही हेल्पलाइन २४ तास उपलब्ध असून, तिचा टोल फ्री क्रमांक ८००-४६३४२ असा आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रास अल खैमाह येथील अल वतन रोडवर प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, वृत्तानुसार, रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. या अपघातात अन्य १४ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ४१ प्रवासी होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्याने हा अपघात झाला.तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आला होता.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीतील फुजैराह येथे काही दिवसांपूर्वी अनेक वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चार भारतीय नागरिकांचा समावेश होता. या घटनेनंतर काही दिवसांतच रास अल खैमाह येथे हा भीषण अपघात घडला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande