पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाला रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा घेराव
नाशिक, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.या बैठकीस नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित होते.बैठक संपल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन हे
Guardian Minister Girish Mahajan's


नाशिक, 27 नोव्हेंबर (हिं.स.)।

: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.या बैठकीस नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार उपस्थित होते.बैठक संपल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन हे आपल्या दालनातून बाहेर येऊन वाहनात बसत असताना नाशिक रिंग रोड व महामार्ग क्र. २९ बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालत वाहनासमोर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून या निर्देशांची तंतोतंत अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.मोबदल्याच्या प्रश्नावर प्रशासनाची उदासीनता : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्देशानुसार बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी जमिनीच्या मोबदल्याचा फेरविचार करणे आवश्यक असताना जिल्हा प्रशासनाने केवळ मोबदल्याचा गुणांक १ वरून २ करण्यासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

मात्र,जिरायत जमिनींचे प्रत्यक्ष परिस्थितीनुसार बागायती व अर्धबागायती क्षेत्र म्हणून फेरसर्वेक्षण करणे,संबंधित गावांतील सर्वोत्तम खरेदीखतांच्या आधारे फेरमूल्यांकन करणे तसेच भूसंपादन कायदा २०१३ च्या कलम १०७ व १०८ अन्वये वाढीव मोबदल्याबाबत आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविणे यासंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे, रिंग रोडमधील इतर भूसंपादन प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पाहणी व विहीर,बोअरवेल,पिके आणि पाण्याचे स्रोत यांच्या आधारे बागायती जमिनीचा लाभ देण्यात आलेला असताना रिंग रोडच्या काही गावांतील शेतकऱ्यांना, विशेषतः सर्व गावांमध्ये बागायत क्षेत्र असताना देखील येथील शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती असतानाही तो गुणांक दिला जात नाहीये.या बाबतीत वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.अलाइनमेंट निश्चित करण्याबाबत गंभीर प्रश्न : रिंग रोडच्या अलाइनमेंटमुळे गोवर्धन ते मखमलाबाद व विंचूर दळवी गावांतील घरे, बागायती जमीन,विहिरी व बोअरवेल बाधित होत आहेत. अलाइनमेंट निश्चित करणे आणि कमीत कमी नुकसान होईल अशा पर्यायी मार्गाचा विचार करणे आवश्यक असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित फाईल उपलब्ध नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्याची बाब शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. गवळवाडी मार्गे पर्यायी अलाइनमेंट निश्चित करून नव्याने फेरसर्वेक्षण करण्यात यावे आणि कमीत कमी घरे व बागायती जमिनी बाधित होतील,अशा पद्धतीने मार्ग निश्चित करण्यात यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.विभागीय आयुक्तांच्या अहवालावर शेतकऱ्यांचा आक्षेप : महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शासनाकडे पाठविलेल्या अहवालामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी सादर केलेले पुरावे,निवेदने व आक्षेप यांचा योग्य प्रकारे समावेश करण्यात आलेला नसल्याचा गंभीर आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदविला.जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश व मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असतानाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.२८ नोव्हेंबर रोजी सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक : शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुरुवातीला निवडक शेतकरी प्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.मात्र, शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की,या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी सर्व भूसंपादन अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी,एमएसआयडीसीचे संबंधित अधिकारी तसेच सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा उपस्थित असणे आवश्यक आहे.त्यानुसार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले.बैठकीचे नियोजन निश्चित झाल्यानंतर सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande