
ठाणे, 27 नोव्हेंबर, (हिं.स.)। ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवातून आम्हाला जीवनाचा अमूल्य ठेवा आणि मोलाचे मार्गदर्शन मिळत असते. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, त्यांच्या अनुभवाचा लाभ घेणे आणि त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करून ज्येष्ठांच्या संघटनात्मक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आम्हीही पुढे नेत असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
ज्येष्ठांना सुरक्षिततेची भावना देणे हे आपले कर्तव्य – महापौर शर्मिला पिंपळोलकर
ज्येष्ठ नागरिकांना आनंदी ठेवण्यासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नसते. प्रेमाने विचारलेली एक विचारपूस, आपुलकीचे दोन शब्द आणि थोडासा वेळ दिला, तरी त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य फुलते. आपल्या ज्येष्ठांनी आयुष्यभर कुटुंबासाठी आणि समाजासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आदर करणे आणि त्यांना प्रेम, सन्मान व सुरक्षिततेची भावना देणे हे आपले कर्तव्य आहे, असे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि आनंदासाठी महापालिकेच्या माध्यमातून यापुढेही विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देणे आणि सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी महापालिका सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही महापौरांनी दिली.
स्पर्धांमधून ज्येष्ठांच्या कलागुणांना मिळाली नवी संधी
ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाला आणि कलागुणांना वाव मिळावा, त्यांना एकत्र येण्याची संधी मिळावी तसेच सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमात महापालिकेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांना पारितोषिकांचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, त्यांचा उत्साह आणि कार्यक्रमातील सहभाग यामुळे हा सोहळा स्नेहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर