'फुलवरा'च्या नायिकांची हुतात्मा स्मारकाला मानवंदना
मुंबई, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकताच या चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरमधून वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा लावणीसा
मुंबई


मुंबई, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता दिवसेंदिवस वाढतच आहे. नुकताच या चित्रपटाच्या फर्स्ट लूक टीझरमधून वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा लावणीसाज समोर आला आणि आता त्यांच्या नव्या रूपाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पारंपरिक लावणीचा डौल, नजाकतदार अदाकारी आणि देखणा साजशृंगार यामुळे दोघींची पहिली झलक प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. पहिला लूक समोर आल्यानंतर वैदेही आणि प्रियदर्शिनी यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन मानवंदना दिली.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचासाक्षीदार असलेला हुतात्मा चौक हा मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक आहे.

या ऐतिहासिक स्थळाला दोघींनी दिलेली भेट त्यांच्या चित्रपटातील लावणीच्या विश्वाशी एक सांस्कृतिक नातं जोडणारी ठरली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांसारख्या शाहिरांनी आपल्या शाहिरीतून जनजागृती केली. लोककलेच्या सामर्थ्याने मराठी अस्मितेचा जागर घडवणाऱ्या या परंपरेत लावणी, तमाशा आणि लोकनाट्य यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

हुतात्मा चौकाच्या ऐतिहासिक स्मृती आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा यांचा सुंदर संगम या भेटीतून साधला. लावणी ही केवळ नृत्यकला नसून तिच्या प्रत्येक अदाकारीत मराठी मातीचा ठसका, कलावंतांची मेहनत आणि परंपरेचा अभिमान सामावलेला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळावर वैदेही आणि प्रियदर्शिनी यांच्या लावणीसाजाची उपस्थिती त्यांच्या नव्या भूमिकांना सांस्कृतिक संदर्भ देणारी ठरली. ‘फुलवरा’च्या माध्यमातून लावणीच्या विश्वातील रंग, संघर्ष आणि कलावंतांचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

‘ झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. वैदेही आणि प्रियदर्शिनीसोबत या चित्रपटात आणखी कोण कोण कलाकार बघायला मिळणार ? आणि चित्रपटाची गोष्ट नेमकी काय असणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande