शेतकऱ्याच्या घरातील भाकरीसोबत दुष्काळाच्या वेदना अनुभवल्या; संकटग्रस्त कुटुंबांना शिंदेंचा मदतीचा विश्वास
शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्यांवर गुन्हे; मुलींचे विवाह, मुलांचे शिक्षण शिवसेनेच्या मदतीने करणार * मेहकरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा, सेवा संकल्प अभियान आणि विकासकामांच्या ऑनलाइन भूमिपूजन-लोकार्पण प्रसंगी शिंदेंचा शेतकऱ्यां
एकनाथ शिंदे मेहकर


एकनाथ शिंदे


* शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्यांवर गुन्हे; मुलींचे विवाह, मुलांचे शिक्षण शिवसेनेच्या मदतीने करणार

* मेहकरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा, सेवा संकल्प अभियान आणि विकासकामांच्या ऑनलाइन भूमिपूजन-लोकार्पण प्रसंगी शिंदेंचा शेतकऱ्यांना दिलासा

मेहकर, 27 नोव्हेंबर (हिं.स.) - दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरातील भाकरीसोबत त्यांच्या जगण्यातील वेदना आणि संघर्ष अनुभवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा विश्वास दिला. दामोदर इंगळे आणि कमलाबाई इंगळे यांच्या साध्या घरात भेट देऊन भोजन स्वीकारताना शेतकरी कुटुंबाची परिस्थिती, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता त्यांनी जाणून घेतली. परिस्थितीमुळे मुलांच्या स्वप्नांना अडथळा येऊ नये, त्यांच्या शिक्षणासाठी शिवसेना मदतीला उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह आर्थिक अडचणीमुळे रखडू नयेत, यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा व सेवा संकल्प अभियान तसेच विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाड, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सावकार, बँका आणि मायक्रोफायनान्स संस्थांच्या कर्जवसुलीचा त्रास सहन करावा लागू नये. वसुलीच्या नावाखाली धमकावणाऱ्या संस्थांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा हजार आणि राज्य सरकारचे अतिरिक्त सहा हजार रुपये, पाच हजार रुपयांची आगाऊ मदत, कर्जवसुली स्थगिती, जमीन महसूल सवलत, कृषी पंप वीज बिलाबाबत दिलासा, परीक्षा शुल्क सवलत आणि मनरेगाच्या निकषांमध्ये शिथिलता अशा उपाययोजनांचा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा ठाम विश्वास देत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क परतावा देण्याच्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या माध्यमातून ११ हजार बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, दोन हजारांहून अधिक कॉक्लियर इम्प्लांट आणि आरोग्य उपक्रमांतून तीन कोटी महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत हजारो महिलांमध्ये कर्करोगाचे निदान वेळेत झाल्याने उपचाराची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळात चारा छावण्या, पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्यांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्यांना घरपोच चारा देण्यावर भर देण्यात येत आहे. जलयुक्त शिवार, जलतारा उपक्रम, श्री श्री रविशंकर यांच्या टीमचे सहकार्य, जलसंधारण, क्लस्टर शेती, कमी पाण्यातील पिके आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून शेतीला पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपत्तीच्या निकषांबाहेरील परिस्थितीतही शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्याने घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राला मदतीचा विश्वास दिल्याचे त्यांनी नमूद केले.

मेहकर शहरासाठी ९२५ कोटी रुपये आणि संपूर्ण मतदारसंघासाठी सुमारे पाच हजार ५०० कोटी रुपयांच्या विकास निधीचा उल्लेख करत आमदार प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यकर्ता घरात नव्हे, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, असे सांगत शिवसेनेने संकटग्रस्तांसाठी मदत केंद्रे उभारून लोकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी आणि जनतेच्या सेवेसाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत काम करण्याची ग्वाही देताना, शेतकऱ्यांच्या संकटात सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे सहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मानधनाची सात लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली. त्यांच्या या योगदानातून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देण्यात आला.

लाभार्थ्यांना विविध साहित्य व अनुदानाचे वितरण

कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान व धनादेशांचे वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande