
मुंबई, 03 नोव्हेंबर (हिं.स.)। नाती म्हटलं की त्यात प्रेम, विश्वास, आपुलकी आणि कधी कधी मतभेदही आलेच. पण एखाद्या घरात प्रेमापेक्षा भीतीचं राज्य असेल, तर त्या घरात पुन्हा आनंद आणि आपलेपणा निर्माण करणं शक्य आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधणारी एक नवी कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे ‘येतेच आता मी नांदायला', एका खंबीर सुनेची आणि आपल्या शब्दापुढे कुणाचंही न चालू देणाऱ्या आजेसासूची ही अनोखी गोष्ट!
साताऱ्यातील टाकळवाडी गावात ठकूबाई थोरात यांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय. सावकारीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण गावावर आपला दरारा निर्माण केला आहे. घरातही त्यांचाच शब्द चालतो. त्यांच्या भीतीमुळे कुटुंबातील प्रत्येक जण स्वतःचा विचार मांडायला घाबरतो. अशा वातावरणात ठकूबाईंच्या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस दाखवणारा एकमेव माणूस म्हणजे त्यांचा नातू अभिजीत.
अभिजीतच्या आयुष्यात शिवानी येते आणि इथूनच सुरू होतो एका नव्या संघर्षाचा प्रवास! हुशार, आत्मविश्वासू आणि प्रेमळ असलेली शिवानी स्वभावाने मात्र ठकूबाईंच्या अगदी विरुद्ध आहे. शिवानी आणि अभिजीत यांचे स्वभाव एकमेकांपेक्षा खूप वेगळे असले, तरी ठकूबाईंच्या दहशतीला न घाबरणारी शिवानीच त्यांना आव्हान देऊ शकते, याची अभिजीतला खात्री आहे. याच विश्वासातून तो शिवानीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.
शिवनीचा या घरात केवळ संसार थाटणं एवढाच हेतू नाही तर, घरातील प्रत्येकाच्या मनात दडलेला भीतीचा पगडा दूर करून त्यांना स्वतःसाठी उभं राहायला शिकवण्याचं आव्हान तिने स्वीकारलंय. आपल्या प्रेमळ स्वभावाने, सकारात्मक विचारांनी ती घरातील सदस्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठकुबाईच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करत असून. शिवानीच्या भूमिकेत ‘पूजा बिरारी’ तर ‘हर्षद अतकरी’ अनिकेतच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या निमित्ताने हर्षद आणि पूजा देखील झी मराठीवर पदार्पण करणार आहेत.
ठकूबाईंसारख्या कणखर आणि हट्टी स्वभावाच्या व्यक्तीचं मन जिंकणं इतकं सोपं असेल का? तिच्या कठोर वागण्यामागे दडलेल्या वेदना आणि कटुता शिवानीला समजून घेता येईल का? ठकूबाईंच्या घरात भीतीची जागा प्रेम घेईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या उलगडणार आहेत. एका बाजूला ठकूबाईंचा दरारा, तर दुसऱ्या बाजूला शिवानीचा आत्मविश्वास! या दोन विरुद्ध स्वभावांमधील संघर्षातून कोण जिंकणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर