
चंदीगड, 04 नोव्हेंबर (हिं.स.)।तिबेटी निर्वासित, पाकिस्तान, बर्मा, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकी देशांमधून भारतात स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना आता हरियाणामध्ये सरकारी नोकरी मिळणार नाही.हरियाणा लोकसेवा आयोगातील (एचपीएससी) नोकरीसाठीची पात्रता आता केवळ भारतीय नागरिक तसेच नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांपुरती मर्यादित करण्यात येणार आहे. मात्र, नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना सरकारकडून पात्रता प्रमाणपत्र जारी करण्यात आले असेल, तरच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरियाणा लोकसेवा आयोग (राज्य सेवा गट-क) विनियम, २००२ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.आयोगात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या गट-क पदांचा समावेश करणे आणि सध्याच्या तरतुदी अद्ययावत सरकारी नियम व निर्देशांनुसार करणे हा या सुधारणांचा मुख्य उद्देश आहे. आयोगातील परीक्षांची वाढती संख्या आणि इतर संबंधित कामांमुळे वाढलेला कामाचा ताण लक्षात घेऊन तृतीय श्रेणीतील पदांची संख्याही वाढवण्यात
येणार आहे.
आयोगात गट-कची एकूण ८५ मंजूर पदे असतील. यामध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या १५ पदांचाही समावेश आहे. या पदांमध्ये एक विभाग अधिकारी, तीन उपअधीक्षक, एक खासगी सहायक, २५ सहायक, दोन वरिष्ठ श्रेणी लघुलेखक, दोन कनिष्ठ श्रेणी लघुलेखक, सहा लघुटंकलेखक, १३ वाहनचालक, २९ लिपिक, एक दस्तऐवज पुनर्संचयक आणि दोन गेस्टेटनर ऑपरेटर या पदांचा समावेश आहे.दहावीपर्यंत हिंदी विषय अनिवार्य असण्याच्या अटीतही बदल करण्यात येणार आहे. आता दहावीमध्ये हिंदी किंवा संस्कृत यापैकी कोणताही एक विषय शिकलेला असणे किंवा उच्च शिक्षणाच्या स्तरावर हिंदी विषयाचा अभ्यास केलेला असणे ग्राह्य धरले जाणार आहे.
गट-क पदांवरील नियुक्तीसाठीच्या पात्रता अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, विनियम १३ अंतर्गत शिस्तभंगविषयक प्रकरणे, अपील आणि इतर सेवाविषयक बाबींसंदर्भातील तरतुदी हरियाणा नागरी सेवा (शिक्षा व अपील) नियम, २०१६ नुसार करण्यात येणार आहेत. यासाठी १९८७ मधील जुन्या नियमांचा संदर्भ बदलण्यात येणार आहे.
महाविद्यालयात कनिष्ठ व्याख्याता सहायक (ज्युनिअर लेक्चरर असिस्टंट) होण्यासाठी आता उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र (पीसीबी) या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.याशिवाय, कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून पाच वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. उमेदवाराने दहावीमध्ये हिंदी किंवा संस्कृत विषयाचा अभ्यास केलेला असावा किंवा उच्च शिक्षणाच्या स्तरावर हिंदी विषय शिकलेला असणे आवश्यक आहे. पदोन्नतीसाठी बारावी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
थेट भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. हरियाणा कर्मचारी निवड आयोगाकडे अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार उमेदवाराचे वय निश्चित केले जाणार आहे.कमाल वयोमर्यादेत सूट हरियाणा नागरी सेवा (सामान्य) नियम, २०१६ नुसार दिली जाणार आहे. नव्या नियमांनुसार, वंचित अनुसूचित जाती, इतर अनुसूचित जाती, मागासवर्गीय, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी आरक्षित असलेल्या रिक्त पदांसाठी आवश्यक अनुभव असलेले पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास आयोग अनुभवाच्या अटीत ५० टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode