सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद
गुंतवणूकदारांची संपत्ती ५.८३ लाख कोटींनी वाढली नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजार आज सलग पाचव्या दिवशी तेजीसह बंद झाला. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि धातू, स्थावर मालमत्ता, वाहन तसेच ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील
Stock market closed


गुंतवणूकदारांची संपत्ती ५.८३ लाख कोटींनी वाढली

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजार आज सलग पाचव्या दिवशी तेजीसह बंद झाला. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि धातू, स्थावर मालमत्ता, वाहन तसेच ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने दमदार कामगिरी केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. विशेष म्हणजे मोठ्या कंपन्यांसोबतच मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बाजारातील तेजी अधिक व्यापक झाली. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ५ लाख ८३ हजार ६७० कोटी रुपयांची वाढ झाली.

बुधवारी बाजाराच्या सुरुवातीला काहीशी नरमाई पाहायला मिळाली. मात्र, जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळताच खरेदीदार सक्रिय झाले. सकाळी दहा वाजल्यानंतर काही काळ नफावसुलीमुळे विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. मात्र, दुपारी बारानंतर पुन्हा खरेदीचा जोर वाढला. दिवसअखेर सेन्सेक्स ०.५० टक्के आणि निफ्टी ०.६३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४.७४ अंकांच्या घसरणीसह ७६,८५३.११ अंकांवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या जोरदार खरेदीमुळे त्याने ४७८.१९ अंकांची उसळी घेत ७७,३९६.०४ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र, त्यानंतर नफावसुली सुरू झाल्याने सेन्सेक्स घसरून ७६,६०४.८५ अंकांपर्यंत खाली आला. पुढील सत्रात धातू, स्थावर मालमत्ता आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. अखेरच्या सत्रातील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्सने ६९६.५५ अंकांची वसुली केली. अखेर ३८३.५५ अंकांच्या म्हणजेच ०.५० टक्क्यांच्या वाढीसह ७७,३०१.४० अंकांवर व्यवहाराची समाप्ती केली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६८.६० अंकांच्या घसरणीसह २३,७४२.२५ अंकांवर खुला झाला. वाहन, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी वाढल्याने निफ्टीने सुरुवातीच्या व्यवहारातच २३,९४६.३५ अंकांचा स्तर गाठला. त्यानंतर नफावसुलीमुळे तो २३,६९६.१५ अंकांपर्यंत घसरला. मात्र, पुन्हा खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टीने १४९.७५ अंकांची म्हणजेच ०.६३ टक्क्यांची वाढ नोंदवली. विशेष म्हणजे दोन सप्टेंबरनंतर प्रथमच निफ्टीने व्यवहाराच्या समाप्तीला २३,९०० अंकांची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली. तो २३,९६०.६० अंकांवर बंद झाला.

क्षेत्रनिहाय व्यवहारात धातू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. या दोन्ही क्षेत्रांचे निर्देशांक जवळपास तीन टक्क्यांनी वधारले. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात दीड टक्क्यांची, तर वाहन क्षेत्रात एक टक्क्याहून अधिक वाढ झाली. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांवर विक्रीचा दबाव कायम राहिला. या क्षेत्राचा निर्देशांक १.५० टक्क्यांनी घसरला. मध्यम कंपन्यांचा निर्देशांक १.५५ टक्क्यांनी, तर लघु कंपन्यांचा निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक वधारला.

या तेजीचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य वाढून ४९३.४९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील सत्रात हे मूल्य ४८७.६५ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५.८३ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

समभागांच्या कामगिरीत भारत इलेक्ट्रॉनिक्सने ४.७१ टक्क्यांची वाढ नोंदवत आघाडी घेतली. अदानी एंटरप्रायझेस ४.४७ टक्के, टायटन ४.२२ टक्के, जिओ फायनान्शियल ३.७३ टक्के आणि मॅक्स हेल्थकेअर ३.५३ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्रीमुळे टीसीएस २.५२ टक्क्यांनी, एचसीएल टेक २.३७ टक्क्यांनी आणि इन्फोसिस १.७३ टक्क्यांनी घसरले. अशा प्रकारे सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande