
मुंबई, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। बहिणींचं नातं म्हणजे कधी मैत्री, कधी भांडणं, तर कधी न बोलताही एकमेकींच्या मनाचा ठाव घेणारी हक्काची साथ! हेच नातं अधिक जवळून अनुभवण्याची संधी ‘बंधू’ या आगामी चित्रपटातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे या दोन कसलेल्या अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजत बेदी प्रस्तुत, जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. ‘बंधू’ चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘बंधू’ हा चित्रपट भावाभोवती केंद्रित असला, तरी त्यातील विविध नात्यांचे भावविश्वही तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावविश्वात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे यांनी एकमेकींसोबत साकारलेले सख्ख्या बहिणींचे नाते विशेष ठरणार आहे. छोट्या-मोठ्या कुरबुरींपासून एकमेकींच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्यापर्यंत, या नात्यातील हळवे क्षण आणि भावनिक गुंतवणूक चित्रपटातून उलगडणार आहे.
एकमेकींच्या प्रतीची आपुलकी आणि समजूतदारपणा यांचा सुंदर अनुभव या दोघींच्या अभिनयातून निश्चित मिळणार आहे.
मृण्मयी देशपांडे सांगते, ‘बंधू’ ही केवळ दोन भावांची गोष्ट नाही, तर कुटुंबांतील नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक गुंतवणूक उलगडणारी कथा आहे. या चित्रपटातील बहिणींचं नातं अतिशय आपुलकीचं आणि हळवं आहे. स्मिताताईंसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करण्याचा अनुभव खूप छान होता. एकमेकींच्या भावना समजून घेत हे नातं पडद्यावर साकारताना एक वेगळीच केमिस्ट्री अनुभवायला मिळाली. हे नातं प्रेक्षकांनाही नक्कीच भावेल, अशी आशा आहे.”
आपल्या भूमिकेविषयी बोलताना स्मिता तांबे म्हणतात, “बहिणीचं नातं खूप खास असतं. या नात्यात प्रेम असतं, भांडणं असतात, एकमेकींची काळजी असते आणि अनेकदा न बोलताही एकमेकींच्या मनातलं ओळखण्याची ताकद असते. ‘बंधू’मधून हे नातं साकारताना त्यातील विविध भावनांशी जोडून घेता आलं, याचा मला खूप आनंद आहे. हे नातं पडद्यावर साकारताना त्यातील हळवेपणा आणि आपलेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.”
चित्रपटातील ‘बंधू रामाचा’ हे पाळणागीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. निरागस प्रेमाची भावस्पर्शी अनुभूती देणारं हे पाळणागीत प्रेक्षकांना एका सुरेल भावविश्वात घेऊन जाणार आहे. या गाण्यात मृण्मयी आणि स्मिता पाहायला मिळणार आहे. या गाण्याचे शब्द वैभव देशमुख यांनी लिहिले असून, विजय नारायण गवंडे यांनी त्याला सुरेल संगीताची साथ दिली आहे. अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांच्या आवाजाने हे पाळणागीत अधिकच श्रवणीय झालं आहे. या चित्रपटातील गाण्यांचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.
दोन कसलेल्या अभिनेत्रींचा सहजसुंदर अभिनय आणि बहिणींच्या नात्यातील भावनिक पदर यांमुळे ‘बंधू’मधील ही बहिणींची जोडी देखील प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर