
नवी दिल्ली , 05 नोव्हेंबर (हिं.स.)। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपण येत्या डिसेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत ढाका येथे परतणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातून बांगलादेशात परतल्यानंतर आपल्याला मृत्युदंड किंवा अटकेला सामोरे जावे लागले, तरीही आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका ई-मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना म्हणाल्या की, नशिबात मृत्यूच लिहिला असेल, तर दुसऱ्या देशात राहून मरण्यापेक्षा आपल्या देशाच्या मातीत आणि आपल्या लोकांमध्ये मरणे पसंत करेन. आपल्या या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेख हसीना यांचा बांगलादेशच्या राजकारणात मोठा आणि प्रदीर्घ इतिहास आहे. त्यांनी १९९६ ते २००१ आणि त्यानंतर २००९ ते २०२४ या काळात सलग चार कार्यकाळ देशाचे पंतप्रधानपद भूषवले आहे. मात्र, ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक आणि व्यापक जनआंदोलनानंतर त्यांना पदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला होता.
त्यानंतर २०२५ मध्ये बांगलादेशच्या विशेष न्यायाधिकरणाने त्यांच्याविरोधात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा खटला चालवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. आंदोलनांदरम्यान सुरक्षा दलांना हिंसक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या हिंसाचारात सुमारे १,४०० जणांचा मृत्यू झाला होता, तर हजारो लोक जखमी झाले होते. मात्र, शेख हसीना यांनी हे सर्व आरोप आणि न्यायाधिकरणाचा निर्णय फेटाळून लावला आहे. हा निर्णय बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बांगलादेशच्या नव्या सरकारने शेख हसीना यांना मायदेशी परत पाठवण्याची मागणी भारताकडे अनेकदा अधिकृतपणे केली आहे. मात्र, भारताने या मुद्द्यावर सावध भूमिका घेतली आहे. ढाका येथील भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की, प्रत्यार्पणासाठी एक निश्चित कायदेशीर आणि प्रक्रियात्मक व्यवस्था असते. त्यामुळे त्यांच्या मायदेशी परतण्याची कोणतीही निश्चित कालमर्यादा सांगता येणार नाही.
मायदेशी परतल्यास आपल्याला अटक होऊ शकते, तुरुंगात डांबले जाऊ शकते किंवा छळ सहन करावा लागू शकतो, याची जाणीव असल्याचे हसीना यांनी मान्य केले. मात्र, परदेशात राहून आपल्या देशवासीयांचे हाल पाहणे आपल्याला शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, भारतातून बांगलादेशात कोणत्या मार्गाने किंवा माध्यमातून परतणार, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
मुलाखतीदरम्यान शेख हसीना यांनी आपल्या आवामी लीग पक्षाविरोधात सुरू असलेल्या कथित दडपशाहीच्या कारवाईबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला. ऑगस्ट २०२४ पासून आपल्या पक्षाच्या किमान २० हजार सदस्यांची हत्या करण्यात आल्याचा आणि हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.बांगलादेशात सध्या सामान्य राजकीय किंवा लोकशाही वातावरण उरलेले नाही. आपल्या पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी सुनियोजित प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
देशातील जहालमतवादी आणि कट्टरतावादी शक्तींचा वाढता प्रभाव याबद्दलही शेख हसीना यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात कट्टरतावादाविरोधात कठोर धोरणे राबवण्यात आली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे अशा शक्ती अधिक निर्ढावल्या असल्याचे त्यांनी म्हटले.मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी भारत किंवा अमेरिकेसारख्या परदेशी शक्तींच्या हस्तक्षेपाची अपेक्षा आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर हसीना यांनी कोणत्याही परदेशी शक्तीच्या पाठिंब्याची आपल्याला गरज नसल्याचे स्पष्ट केले.त्या म्हणाल्या, आमचा सर्व देशांसोबत सहकार्य आणि मैत्रीचे संबंध ठेवण्यावर विश्वास आहे. मात्र, मायदेशी परतण्यासाठी मला कोणत्याही अन्य देशाच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode