पुणे - खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाई
पुणे, 06 नोव्हेंबर, (हिं.स.)। सणासुदीच्या व गर्दीच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून प्रवाशांची आर्थिक लूट करून शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा बसेसवि
पुणे - खासगी प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारणी केल्यास कठोर कारवाई


पुणे, 06 नोव्हेंबर, (हिं.स.)। सणासुदीच्या व गर्दीच्या काळात खासगी प्रवासी बसेसकडून प्रवाशांची आर्थिक लूट करून शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिलोमीटर भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा बसेसविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत सप्टेंबर व ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एकूण ९२९ खासगी प्रवासी बसेसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१५ वाहने दोषी आढळली असून, जादा भाडे आकारणी करणाऱ्या 7 वाहनांसह संबंधित प्रकरणांमध्ये एकूण २५.८२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

तसेच १ नोव्हेंबर २०२६ पासून राबविण्यात येत असलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ३०९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६५ वाहने दोषी आढळली असून, १४ वाहने जादा भाडे आकारताना आढळली. या कारवाईत ७.०४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

प्रवाशांनी तक्रार नोंदवावी

खासगी प्रवासी बसेसकडून निर्धारित दरापेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्यास किंवा प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणी येत असल्यास प्रवाशांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व तिकिटाचा फोटो यासह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक, मालक व प्रतिनिधींनी वाहनांची सर्व कागदपत्रे वैध ठेवावीत, शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेतच प्रवासी भाडे आकारावे आणि परिवहन विभागाच्या तपासणी मोहिमेस आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande