
अमरावती, 06 नोव्हेंबर, (हिं.स.)। दुष्काळाचे सावट आणि पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी केवळ प्रशासकीय उपाययोजना पुरेशा नसून त्यासाठी लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांची जोड आवश्यक आहे, हा संदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगरूळ दस्तगीर येथे दिला गावाला भेट देत त्यांनी थेट शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या मदतीने वनराई बंधाऱ्याची उभारणी केली, तर पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी स्वतः शेतात चारा पिकाची पेरणी करून प्रत्यक्ष कृतीतून लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दौऱ्यात सीईओ सत्यम गांधी यांनी शिवार फेरी करीत विविध उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी शेतकरी अजय मेश्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत शेतातील जलतारा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रस्तावित कामांचे नियोजनही यावेळी करण्यात आले.
यानंतर ग्रामपंचायत परिसरात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाई हा अत्यंत गंभीर विषय असून, त्यावर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास या संकटाचा प्रभावीपणे सामना करता येईल, असे प्रतिपादन गांधी यांनी केले. यावेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्यांवर त्यांनी चर्चा करून निराकरणासाठी मार्गदर्शन केले.पशुधनासाठी वर्षभर पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चारा नियोजन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक शरद पालखडे व त्यांच्या चमूने सादर केले. तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांना जलतारा योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.दरम्यान, मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायतीच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभही सीईओ सत्यम गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.प्रशासनाच्या योजनांची माहिती देण्यासोबतच प्रत्यक्ष शिवारात उतरून काम करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत करीत ऋणनिर्देश व्यक्त केले. या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे यांनी यशस्वीरीत्या केले.तसेच तहसीलदार अभय घोरपडे यांनी दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाई याबाबत माहिती दिली.
यावेळी तहसीलदार अभय घोरपडे, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे, पशुधन विकास अधिकारी धीरज दातिर, तालुका आरोग्य अधिकारी शहनाझ अन्सारी, ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रवीण आखरे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी निलेश वाघ, प्रल्हाद तेलंग, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय गुल्हाणे, गजानन सांगळे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील गोरे, सचिन तसर, राहुल धोटे, माजी उपसभापती माधुरी दुधे, माजी सरपंच सतीश हजारे, ग्राम महसूल अधिकारी सारिका रघुवंशी, पी. डी. आलोणे, सहाय्यक कृषी अधिकारी जे. डी. गडमळे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी