
अमरावती, 06 नोव्हेंबर, (हिं.स.)। दुष्काळाच्या भीषण परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे, ही भावना मनात ठेवून आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव आणि प्रेरणादायी संकल्पना मांडली. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून तो दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळविण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
वाढदिवसानिमित्त फ्लेक्स बॅनर, जाहिराती, हार-तुरे यावर अनावश्यक खर्च न करता शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या आप्तेष्ट, हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यासाठी खर्च होणारी रक्कम त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतपेटीत जमा करावी, असे आवाहन आमदार पोटे पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केले होते.
त्यांच्या या सामाजिक जाणीवेतून केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसानिमित्त हजारो नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी आपापल्या परीने शक्य ती आर्थिक मदत मदतपेटीत जमा करून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलला. या उपक्रमातून जवळपास लाखो रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा झाला.
वाढदिवस साजरा करताना होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच पैशातून संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याची ही संकल्पना नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरली. शुभेच्छा, सत्कार आणि दिखाऊपणापेक्षा सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत वाढदिवसही समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करता येतो, याचा आदर्श आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी या उपक्रमातून घालून दिला.
आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्याने या उपक्रमाला लोकसहभागाचे स्वरूप प्राप्त झाले. वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक सेवेची जोड देणारा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी