
* विविध ब्रँड्सच्या 1000 पेक्षा जास्त औषधांच्या किमतीत मोठी घट
* ग्राहकांची दरवर्षी 3500 कोटी रुपयांहून अधिकची बचत होण्याचा अंदाज
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.) - रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारितील औषध निर्माण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) 137 कर्करोगविरोधी औषधांच्या कमाल किरकोळ विक्री दरांवरील व्यापारी लाभांश अर्थात ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितील आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे 17 ऑक्टोबर 2026 रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. या औषधांचे सुधारित दर 9 नोव्हेंबर 2026 पासून अंमलात येणार आहेत.
आजमितीपर्यंत, 76 औषध कंपन्यांनी 121 औषधांचा अंतर्भाव असलेल्या 1225 कर्करोगविरोधी औषध फॉर्म्युलेशन्सच्या सुधारित कमाल किरकोळ विक्री दरांची माहिती दिली आहे. त्यानुसार कर्करोगविरोधी 1031 औषध फॉर्म्युलेशन्सच्या कमाल किरकोळ विक्री दरांमध्ये कपातीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 600 ब्रँड्सनी 50 टक्क्यांपेक्षा जास्त कपातीची नोंद केली असून, सर्वाधिक कपातीचे प्रमाण 96.45 टक्के इतके आहे. यासोबतच, निश्चित केलेल्या 137 कर्करोगविरोधी औषधांपैकी 10 ते 15 औषधे अद्याप भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणे बाकी आहे. मात्र, ही औषधे बाजारात येतील त्यावेळी त्यांच्यावरही ट्रेड मार्जिनचे हे नियम (TMR - Trade Margin Rationalization) लागू होणार आहेत.
येत्या 9 नोव्हेंबर 2026 पासून किंमतीलमधील ही कपात लागू होईल. यामुळे ग्राहकांची दरवर्षी 3,502.31 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे.
कर्करोगाच्या उपचारांसाठी आवश्यक औषधांची उपलब्धता, तसेच ही औषधे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असावीत यासंदर्भातल्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठीच केंद्र सरकारने अनुसूचित कर्करोगविरोधी औषधांवरील ट्रेड मार्जिनची मर्यादा निश्चित करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
याअंतर्गत 17 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेली अधिसूचना SO 5690 (E) पुढील आदेशांपर्यंत लागू राहील. मात्र, औषधे (किंमत नियंत्रण) आदेश, 2013 (DPCO - Drugs Prices Control Order, 2013) च्या परिच्छेद 20(1) मधील तरतुदींनुसार उत्पादक वार्षिक किंमतीत वाढ करू शकतात. मात्र, त्यासाठी 30 टक्क्यांच्या कमाल निर्धारित ट्रेड मार्जिनचे सातत्यपूर्णतेने पालन करणे बंधनकारक असेल.
प्रत्येक किरकोळ विक्रेता, पुरवठादार, रुग्णालय आणि संस्थेने कर्करोगविरोधी औषधांची सुधारित दरांची यादी आपल्या संकेतस्थळावर आणि आवारात ठळकपणे प्रदर्शित करणे गरजेचे असेल. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या (NPPA) अधिसूचनेनुसार, राज्य औषध नियंत्रकांद्वारे उत्पादक, पुरवठादार, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांकडून या नियमाचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवली जाईल. ग्राहकांना Pharma Sahi Daam या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे तसेच राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या www.nppa.gov.in या संकेतस्थळावरून लागू असलेल्या किमती तपासता येणार आहेत. यासोबतच सुधारित दरांच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा पालन न झाल्यास ग्राहकांना प्राधिकरणाकडे तक्रारही नोंदवता येणार आहे.
तक्रारी नोंदवण्यासाठी खाली नमूद पर्यायांचा वापर करता येईल. :
ईमेल: monitoring-nppa[at]gov[dot]in
मदत क्र. : 1800-11-1255
टपालासाठी पत्ता : उपसंचालक, संनियंत्रण (Monitoring), राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA), 3 रा मजला, वायएमसीए सांस्कृतिक केंद्र इमारत, 1 जय सिंग मार्ग, नवी दिल्ली - 110001.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी