
ठाणे, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। ऐन दिवाळीच्या धामधुमीत ठाणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत झारखंडमधील कुख्यात आणि फरार नक्षलवाद्याला डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून अटक केली आहे. संजय सरोज यादव ऊर्फ संजय गोडराय ऊर्फ बुधराम (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. झारखंड सरकारने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. महाराष्ट्र एटीएसच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय यादव हा झारखंडमधील जंगल परिसरातील रहिवासी असून, तो गेल्या दहा दिवसांपासून ठाकुर्ली येथे वास्तव्यास होता. झारखंडमधील सुरक्षा यंत्रणांना हवा असलेला हा नक्षलवादी महाराष्ट्रात आल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने ठाकुर्ली परिसरात पाळत ठेवून योग्य संधी साधत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यास झारखंड सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
अटकेनंतर संजय यादवला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या दहा दिवसांपासून तो ठाकुर्लीमध्ये नेमका कोणाच्या मदतीने राहत होता, त्याला निवासाची व्यवस्था कोणी करून दिली होती आणि तो स्थानिक पातळीवर कोणाच्या संपर्कात होता, याचा तपास एटीएसकडून केला जात आहे. तो एकटाच राहत होता की त्याला अन्य कोणाची मदत मिळत होती, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, संजय यादव झारखंडमधून महाराष्ट्रात नेमका कशासाठी आला होता, ठाकुर्ली परिसरात वास्तव्यास राहण्यामागे त्याचा काय उद्देश होता, याबाबत तपास यंत्रणांना माहिती मिळवायची आहे. महाराष्ट्रात राहून त्याने कोणत्याही नक्षलवादी कारवायांचे नियोजन केले होते का, तसेच राज्यातील अन्य संशयित व्यक्तींशी त्याचे संपर्क होते का, याचाही तपास सुरू आहे.
त्याच्या मागील काही दिवसांतील हालचाली, स्थानिक संपर्क आणि महाराष्ट्रात येण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी एटीएसकडून चौकशी केली जात आहे. झारखंड सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या नक्षलवाद्याला ठाणे जिल्ह्यातून अटक झाल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या अटकेमागे आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule