



दिसपुर, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। गेली 86 वर्षे सीआरपीएफ आपली उत्तम कार्यक्षमता, शौर्य, संयम, वीरता आणि त्याग याद्वारे देशाची अंतर्गत सुरक्षा भक्कम करत आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. ते केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 87 व्या स्थापना दिनानिमित्त आसाममध्ये गुवाहाटी इथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा, सीआरपीएफचे महासंचालक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
शाह पुढे म्हणाले की, सीआरपीएफशिवाय आपण देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पनाही करू शकत नाही. स्थापनेपासून 86 वर्षांत सीआरपीएफ आपल्या कर्तव्यनिष्ठेमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा भक्कम आधार बनली आहे. त्याचे चांगले परिणामदेखील दिसून येत आहेत असे शाह म्हणाले. सीआरपीएफच्या 2,270 जवानांनी देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च त्याग केला आहे आणि यासाठी संपूर्ण देश त्यांचा आभारी असून त्यांना आदरांजली अर्पण करत आहे. कर्तव्याप्रति समर्पण व त्याग यामुळेच सीआरपीएफच्या जवानांनी अनेक प्रसंगांमध्ये देशाचे संरक्षण केले आहे असे शाह म्हणाले.
11-12 वर्षांपूर्वी देशासमोर तीन प्रमुख आव्हाने होती, जम्मू आणि काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येकडील भाग, जो देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील होता. आज या तिन्ही भागांत शांतता प्रस्थापित करण्यात यश आल्याचे शाह यांनी सांगितले. या तीन संवेदनशील प्रदेशांमध्ये एकेकाळी बॉम्बस्फोट, गोळीबार, बंद, आंदोलने आणि तोडफोड यांचे राज्य होते, मात्र आता हे तीनही प्रदेश विकासाचे इंजिन बनले असून विकासाच्या वाटेवर संपूर्ण देशाचे नेतृत्व करत आहेत. सीआरपीएफच्या वीर हुतात्मा जवानांच्या त्यागाशिवाय, या तीन प्रदेशांना विकासाच्या मार्गावर आणणे अशक्य झाले असते, असे ते म्हणाले.
आजचे सीआरपीएफ दिनाचे संचलन आणखी एका दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. सीआरपीएफच्या 86 वर्षांच्या इतिहासात, पहिल्यांदाच ईशान्येकडील आसाममध्ये या दलाचा स्थापना दिन साजरा होत आहे आणि ही बाब आपल्या सर्वांसाठी तसेच संपूर्ण ईशान्येकडील प्रदेशासाठी अभिमानाची आहे, असे ते म्हणाले. 2019 मध्ये, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचे (सीएपीएफ) वार्षिक संचलन देशाच्या विविध भागात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि आज, सीआरपीएफ संचलन देशाच्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक- ईशान्य भारतात आयोजित केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. आज 14 सीआरपीएफ जवानांना शौर्यासाठी पोलिस पदक, 5 जवानांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि 5 सीआरपीएफ बटालियनना उत्कृष्ट कामगिरीसाठी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. सीआरपीएफचा प्रवास 1939 मध्ये केवळ 2 बटालियनसह सुरू झाला होता आणि आज 248 बटालियन आणि 3.25 लाख जवानांच्या संख्येसह, सीआरपीएफ जगातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल बनले आहे, असे त्यांनी नमूद केले. सीआरपीएफने संपूर्ण देशाच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे शाह यांनी अधोरेखित केले. 9 एप्रिल 1965 रोजी कच्छच्या रणात, सरदार पोस्टवर सीआरपीएफने पाकिस्तानी सैन्याचा सामना करताना मोठे शौर्य दाखवले आणि म्हणूनच दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस 'शौर्य दिन' म्हणून साजरा केला जातो, असे शाह यांनी सांगितले.
डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात कोलकातामध्ये 78 पोलिस कर्मचारी शहीद झाले तरीही सीआरपीएफने धैर्याने मोर्चा सांभाळला, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. सीआरपीएफने संसदेवरील दहशतवादी हल्ला उधळून लावला आणि 2005 मध्ये श्री रामजन्मभूमीवरील हल्ला निष्फळ ठरल्याचे त्यांनी सांगितले. सीआरपीएफचे जवान कधीही त्यांच्या कर्तव्यात कधीही चुकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर, एकही गोळी झाडावी लागली नाही आणि हे सुनिश्चित करण्यात सीआरपीएफने खूप महत्त्वाची भूमिका बजावली, असेही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना शून्यावर आल्या आहेत, उद्योग येत आहेत आणि विकास होत आहे. यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ आणि विशेषतः जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे मोठे योगदान आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यातही सीआरपीएफने मोठी भूमिका बजावली आहे असेही त्यांनी सांगितले.
अमित शाह म्हणाले की, देशातील 12 राज्ये आणि असंख्य जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद पसरला असून भारत सरकारने जेव्हा या संकटाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सीआरपीएफ आणि कोब्रा दलाच्या जवानांनी या प्रयत्नात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. इतके मोठे, गुंतागुंतीचे आणि कठीण काम अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले आणि सीआरपीएफ कर्मचाऱ्यांमुळेच आपण 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल असे आत्मविश्वासाने सांगू शकत आहोत, असे ते म्हणाले. नक्षलवादाविरुद्धच्या ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत, सीआरपीएफ जवानांनी अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत,तळपत्या उन्हात 45 अंश सेल्सिअस तापमानात तग धरून 21 दिवसांची मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला नष्ट केला. ते पुढे म्हणाले की, सीआरपीएफ जवानांनी असाधारण धैर्याचे दर्शन घडवत कडक उन्हात 45 अंश सेल्सिअस तापमानान टेकड्यांवरील खडक तापलेले असतानाही 21 दिवसांच्या मोहिमेत एक इंचही मागे न हटता अखेर नक्षलवाद्यांचा धोरणात्मक तळ उद्ध्वस्त केला. सीआरपीएफ आणि कोब्रा दलाने देशाची लाल दहशतवादापासून सुटका करण्यात खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे, ते म्हणाले .
विविध धार्मिक उत्सव, महाकुंभ आणि अमरनाथ यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यात सीआरपीएफ जवानांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले . सीआरपीएफने देशाची अंतर्गत सुरक्षा सातत्याने बळकट केली असून त्याचे संरक्षण केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule