
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी (हिं.स.) - महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना पदावरून हटवावे आणि त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या संदर्भात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी लक्ष घातले पाहिजे, अशी विनंतीही केली आहे.
रोहित पवार यांनी शनिवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दावा केला की, अपघातग्रस्त लिअरजेट ४५ विमानाच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हीएसआर विमान कंपनीशी मंत्री नायडू यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्या कंपनीला वाचविण्याचे प्रयत्न केंद्रातील वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. या अपघाताची स्वतंत्र आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी.
पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात रोहित पवार यांनी म्हटले आहे की, तुम्ही (पंतप्रधान मोदी) नेहमीच अजितदादा आणि देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल आदर दाखवला आहे. त्यामुळेच या अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्री नायडू यांना त्यांच्या पदावरून राजीनामा देण्यास सांगण्यात यावे. व्हीएसआर प्रकरणात डीजीसीएवर कोणत्याही प्रकारे प्रभाव पडला नाही याची खात्री करण्यासाठी हे आवश्यक आहे.
विमान अपघाताशी संबंधित विविध मुद्दे अधोरेखित करताना हा घातपात झाल्याचा संशय रोहित पवार यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, व्हीएसआर कंपनीला वाचवले जात आहे. कारण या कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे नायडू यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे. या प्रकरणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चौकशीची मागणी करत आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. पण आपल्याला ट्रोल करून धमक्या मिळत आहेत. सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही. पण भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट ऑथोरिटीच्या माध्यमातून या अपघाताची माहिती सहज मिळते, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. दुसरीकडे या अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये विमान हवेतच एका बाजूला झुकल्याचे दिसत आहे. ब्लॅक बॉक्सबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताच्या वेळी फक्त एकच नव्हे तर अनेक स्फोट झाले होते. विमानात सामान ठेवण्याच्या जागी पेट्रोल कॅन ठेवले होते, ज्यामुळे आग आणखी भडकली. या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली पाहिजे. यात दोन प्रकारचा कट असू शकतो. राजकीय किंवा व्यावसायिक, असेही रोहित पवार म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी