ऍपल पे लवकरच भारतात होणार लाँच
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Apple Inc. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ऍपल पे’ ही सेवा भारतात लाँच होण्याची शक्यता असून, ब्लूमबर्गच्या ता
Apple Pay


मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Apple Inc. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ऍपल पे’ ही सेवा भारतात लाँच होण्याची शक्यता असून, ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार जून-जुलै 2026 पर्यंत ती अधिकृतपणे सुरू होऊ शकते. भारतातील आयफोन वापरकर्त्यांसाठी ही मोठी बातमी मानली जात आहे.

सध्या भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात गुगल-पे, फोन-पे आणि पेटीएम यांसारख्या ऍप्सचं वर्चस्व आहे. मात्र ‘ऍपल पे ’ आयफोन आणि ऍपल वॉच वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीय पर्याय ठरू शकतो. ही सेवा ‘टोकनायझेशन’ तंत्रज्ञानावर आधारित असून व्यवहार करताना प्रत्यक्ष कार्ड क्रमांक शेअर केला जात नाही, त्यामुळे सुरक्षेची पातळी अधिक मजबूत राहते. एनएफसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्राहक दुकानांमध्ये ‘टॅप-टू-पे’ पद्धतीनं सहज व्यवहार करू शकतील. याशिवाय ऑनलाइन खरेदी आणि विविध ऍप्समधील पेमेंट्सही सुलभ होतील. फेस आयडी किंवा टच आयडीद्वारे प्रमाणीकरण केल्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार आहे.

भारतात सेवा सुरू करण्यासाठी ऍपलने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांसारख्या प्रमुख बँकांशी तसेच व्हिसा आणि मास्टरकार्ड या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्कशी चर्चा सुरू केली आहे. तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबतही प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. भारतीय नियमांनुसार डेटा लोकलायझेशन आणि यूपीआय एकत्रीकरण महत्त्वाचे असल्याने सुरुवातीला कार्ड-आधारित संपर्करहित पेमेंट्स सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर यूपीआय सेवा जोडली जाऊ शकते. भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचा वेग झपाट्याने वाढत असताना ‘ऍपल पे’ची एन्ट्री स्पर्धा अधिक तीव्र करणार आहे. सेवा सुरू झाल्यास आयफोन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुविधाजनक पेमेंट अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande