
छत्रपती संभाजीनगर, 28 फेब्रुवारी (हिं.स.)साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत थेट कर्ज योजेनअंतर्गत एक लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. त्याअंतर्गत दिलेल्या मुदतीत ३११ कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले.त्यातील १६० अर्ज छाननी अंतर्गत पात्र झाले आहेत. तर १५१ कर्ज मागणी अर्ज अपात्र आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक प्रणिता बोराडे यांनी कळविले आहे. पात्र अर्जांपैकी प्रत्यक्ष लाभार्थी निवडीसाठी दि.६ माच रोजी सोडत पद्धतीने निवड केली जाणार आहे.
१६० पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष ६५ व महिला ९५ अर्ज आहेत. या योजनेचे जिल्हा कार्यालयास ५० प्रकरणांचे उद्दिष्ट असून अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या मान्येतेनुसार चिठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) निवड करावयाची आहे. त्या करीता शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह खोकडपुरा, शिवाजी हायस्कुलच्या शेजारी छत्रपती संभाजीनगर येथे लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थीची निवड चिठ्ठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) होणार आहे. तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अर्जदारांनी या सोडत बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती. प्रणिता रा. बोराडे (सरपते) यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis