नागपूरमधील घनकचऱ्यासाठी भांडेवाडी येथे नव्या बायोगॅस प्रकल्पासह प्रक्रिया क्षमतेत वाढ -  माधुरी मिसाळ
मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। नागपूर शहरात दररोज सुमारे 1400 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून हा सर्व कचरा सध्या भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमध्ये संकलित केला जात आहे. शहरातील वाढत्या कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने वि
नागपूरमधील घनकचऱ्यासाठी भांडेवाडी येथे नव्या बायोगॅस प्रकल्पासह प्रक्रिया क्षमतेत वाढ -  माधुरी मिसाळ


मुंबई, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। नागपूर शहरात दररोज सुमारे 1400 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत असून हा सर्व कचरा सध्या भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमध्ये संकलित केला जात आहे. शहरातील वाढत्या कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले असून प्रकल्प प्रक्रिया क्षमतेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी, भांडेवाडीच्या 55 एकर जागेपैकी 17 एकर क्षेत्रावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये 200 एमएलडी क्षमतेचा तसेच 130 एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र सांडपाणी प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत असल्याचे सांगितले.

दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी नागपूर महानगरपालिकेने बीओटी तत्त्वावर पाच वर्षांच्या कालावधीसाठी एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. सध्या 500 टन कचऱ्यावर एका ठिकाणी प्रक्रिया केली जाते, तर भूमि ग्रीन एनर्जीच्या 10 एकर जागेवर 700 टन कचऱ्याची हाताळणी केली जाते. तसेच अन्य एका प्रकल्पाद्वारे दररोज सुमारे 900 ते 1000 टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरू आहे.

याशिवाय भविष्यातील गरज लक्षात घेऊन 1000 टनांपेक्षा अधिक (20 टक्के अतिरिक्त) कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भांडेवाडी येथे 30 एकर जागेवर नवीन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट उभारण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मे 2026 पर्यंत हा प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. या नव्या प्रकल्पाद्वारे दररोज सुमारे 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याची माहिती राज्यमंत्री मिसाळ यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande