
- पाणी, चहा आणि अन्नासाठी वाहनचालकांची धावपळ- प्रशासनाच्या संथ कारभारावर तीव्र नाराजी
मुंबई, 04 फेब्रुवारी (हिं.स.) - मंगळवारी संध्याकाळी प्रोपीलीन गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. त्यानंतर 24 तास झाले तरी वाहतूक कोंडी सुटलेली नाही. खंडाळा घाट विभागातील आडोशी बोगद्याजवळ
हा प्रकार घडला. त्या टॅंकरमधून वायू गळती होत असल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बुधवारी सायंकाळ होऊन देखील खोळंबलेली होती. एकामागोमाग एक अशी 15 ते 20 किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत होत्या. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी बेहाल झाल्याचे दिसून आले. तर अनेक जण प्रशासनाच्या नावाने चीड व्यक्त करतानाही दिसले.
हा द्रुतगती महामार्ग सहसा मुंबई आणि पुणे दरम्यानचा सर्वांत जलद आणि सोपा मार्ग मानला जातो, परंतु एका अपघातामुळे 24 तासांहून अधिक काळ तो पूर्णपणे बंद राहिला. टँकर उलटताच त्यातून गॅस गळू लागला. प्रोपीलीन गॅस अत्यंत ज्वलनशील असतो आणि लहानशी ठिणगी देखील मोठा स्फोट घडवू शकते. यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या चालकांमध्ये घबराट निर्माण झाली.
या घटनेचा परिणाम इतका तीव्र होता की आडोशी बोगदा ते सोमाटणे दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या प्रचंड वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांची अक्षरशः उपासमार झाली. पाणी, चहा आणि अन्नासाठी वाहनचालकांची धावपळ उडाली होती. अखेर उर्से टोल नाक्याजवळील ‘कार्णीवल’ फूड मॉल वाहनचालकांसाठी एकमेव आधार ठरला. येथे चहा, पाणी व नाश्त्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. दीर्घकाळ अडकून पडलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर थकवा, अस्वस्थता आणि नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित न राहता, महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली.
गळती होत असलेला गॅस हवेत वेगाने पसरत असल्यामुळे अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा आणि वाहतूक थांबवली होती. या वाहतूक कोंडीमुळे कोणी पहाटे चार वाजल्यापासून, तर कोणी रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले असून अनेकांची फ्लाइट चुकली आहे. काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी, अन्न व शौचालयांची सुविधाही अपुरी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, “टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन परिस्थितीत महामार्ग इतका वेळ बंद का राहतो?” असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून महामार्ग मोकळा करावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून करण्यात आली.
सुरक्षेच्या कारणास्तव महामार्हावरील एक लेन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेत रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान प्रशासनाकडून अधिकाऱ्यांनी ताम्हिणी घाट किंवा माळशेज घाटासारखे पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला. आज दिवसभरात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहने वळवल्याने अत्यंत संथ गतीने वाहतूक सुरू होती. मात्र, जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) देखील एक्सप्रेसवेच्या वाहतुकीमुळे जाम झाला होता. पुण्यातून मुंबईला किंवा मुंबईतून पुण्याला जाणाऱ्यांनी लोणावळा घाट टाळून अन्य मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत होते.
ज्या यंत्रणा आहेत त्यांनाही कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचणे कठीण होत आहे. हेल्प फाऊंडेशन रेस्क्यू टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आज, बुधवारी दुपारच्या सुमारास एनडीआरएफ टीम इथे पोहचलीय, टाटाची टीम आहे. केमिकल तज्ज्ञ इथे पोहचले.
पर्यायी मार्ग कोणते?
मार्गे ताम्हिणी घाट (कोकण मार्गे) : पुणे - पौड - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - इंदापूर - पेण - मुंबई. (हा मार्ग थोडा लांबचा असला तरी विनाअडथळा प्रवास होईल).
मार्गे माळशेज घाट (कल्याण-ठाणे साठी) : पुणे - चाकण - राजगुरुनगर - नारायणगाव - माळशेज घाट - मुरबाड - कल्याण/भिवंडी.
भीमाशंकर-मंचर मार्ग : उत्तर मुंबई किंवा पालघरला जाणाऱ्यांनी पुणे - मंचर - जुन्नर या मार्गे माळशेज घाटाकडे वळावे.
प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना
एसी वापरताना काळजी घ्या : गॅस गळती परिसरातून जाताना कारच्या काचा बंद ठेवा आणि एसी इंटरनल एअर सर्कुलेशन मोडवर ठेवावा.
इंधनाची टाकी पूर्ण भरा : घाट आणि पर्यायी मार्गावर वाहतूक संथ असल्याने प्रवासाचा वेळ ३ ते ६ तासांनी वाढू शकतो. त्यामुळे पुरेसे इंधन गाडीत असल्याची खात्री करा.
पाणी आणि अन्न : लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सोबत पुरेसे पाणी आणि कोरडा खाऊ सोबत ठेवणे आवश्यक आहे, कारण पर्यायी मार्गावर सुविधा मिळणे कठीण होऊ शकते.
अवजड वाहने : जड वाहनांना तूर्तास फूड मॉल्स आणि महामार्गाच्या कडेला असलेल्या ‘ले-बाय’मध्ये पार्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी