कोलाड–रोहा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा, २०० मीटर रस्ता धोकादायक
रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड–रोहा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. कोलाड नाक्याजवळील द. ग. तटकरे चौकासमोर मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला असून पुलाखाल
Kolad checkpoint is dangerous


रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड–रोहा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. कोलाड नाक्याजवळील द. ग. तटकरे चौकासमोर मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला असून पुलाखालील भागात डांबरीकरणच करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाश्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांचे टायर फुटणे, खडी उडून नागरिक जखमी होणे आणि अचानक ब्रेक लागल्याने अपघात टळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप प्रवासी वर्गातून केला जात आहे.

मुरुड–कोलाड–ताम्हिणी मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण दर्जेदार झाले असताना केवळ द. ग. तटकरे चौकासमोरील सुमारे २०० मीटरचा भाग अपूर्ण ठेवण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार खड्डे भरले जातात, पण काही दिवसांतच पुन्हा रस्ता उखडतो — हा नेमका निष्काळजीपणा की ठेकेदारीतील हलगर्जीपणा? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

कोलाड नाका हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून ७० पेक्षा अधिक गावांतील नागरिक, विद्यार्थी आणि कामगार याच मार्गाचा वापर करतात. वाहतूक कोंडी, धोकादायक वळण आणि उखडलेला रस्ता — या तिहेरी संकटामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला असून तातडीने सिमेंट काँक्रिटचा पक्का रस्ता करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande