
- ओझर विमानतळ विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन
नाशिक, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहराची प्रगती होणार आहे तर जिल्ह्यातील द्राक्ष कांदा वाईन व इतर उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
दावोस कराराच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून, यामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यात १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये विमान, रेल्वे आणि रस्त्यांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नाशिक हे विकासाची उंच भरारी घेणारे शहर होईलच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नाशिक विमानतळ विस्तारीकरण कामाचे भूमिपूजन ओझर विमानतळ येथे रविवार (दि. ८) रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर, नितीन पवार, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनिषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अमेरिका-युरोप करारामुळे आता भारतातून निर्यात वाढणार आहे. त्यात नाशिक जिल्हा धार्मिकतेबरोबरच कृषी, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. त्यामुळे जलद कार्गो सुविधा, वाढलेली विमानतळ क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्समुळे उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोड मिळणार आहे. टेक्सटाईल, अॅग्रो-प्रोसेसिंग, फार्मा तसेच विविध उत्पादन क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. परिणामी, स्थानिक तरुणांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
नाशिक शहरातील अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव, इगतपुरीसह धुळे, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदुरबार अशा प्रमुख औद्योगिक वसाहतींना या विमानतळाचा मोठा लाभ होणार आहे. यावेळी नाशिक मनपाचे नगरसेवक, भाजप पदाधिकारी, उद्योजक, पर्यटनासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
नाशिक विमानतळासाठी ६२५ हून अधिक कोटींचा निधी
नाशिक विमानतळासाठी युद्धपातळीवर पुढील विकास सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सहा विमानतळ बांधणाऱ्या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. पुढील ११ महिन्यांत विमानतळ ग्राहक सेवेसाठी उपलब्ध होईल. २०१५ च्या कुंभमेळ्यापेक्षा १० ते १५ पट गर्दी लक्षात घेऊन यंदा नाशिक विमानतळाचा ६२५ हून अधिक कोटी रुपयांचा निधी खर्च करून विकास करण्यात येत आहे.२०२३ मध्ये या विमानतळावरून १ लाख, तर २०२५ मध्ये ३ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रति तास ३०० ऐवजी प्रतितास १ हजार प्रवासी हाताळण्याची क्षमता या विमानतळात निर्माण होणार आहे. तसेच सहा ऐवजी १२ विमानांच्या पार्किंगची व्यवस्था होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV