
मुंबई, ८ फेब्रुवारी (हिं.स.) : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल (शनिवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ७३१ जिल्हा परिषद गट आणि १,४६२ पंचायत समिती गण यांच्यासाठी एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण ६८.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनपा, नगरपालिका याप्रमाणे जिल्हा परिषदेत देखील भाजप नंबर एकचा पक्ष राहिलं, असे मत राजकीय जाणकारांचे आहे.
आता उद्या, (९ फेब्रुवारी) सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केले जातील. निकाल जाहीर होताच संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृृत आकडेवारीनुसार दुपारी ५.३० वाजेपर्यंत रायगड ६९.९१ टक्के, रत्नागिरी ५५.७९ टक्के, सिंधुदुर्ग ६१.९८ टक्के, पुणे ६८.३५ टक्के, सातारा, ६७.८० टक्के, सांगली ६९.७६ टक्के, सोलापूर ६५.९० टक्के, कोल्हापूर ७४.४५ टक्के, छत्रपती संभाजीनगर ७२.६९ टक्के, परभणी ७४.८९ टक्के, धाराशिव ६५.२२ टक्के, लातूर ६३.७९ टक्के मतदान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी