
तेहरान, 10 मार्च (हिं.स.)।पश्चिम आशियामध्ये अमेरिका आणि इस्रायल यांच्या वतीने इराणवर सुरू असलेले सततचे हल्ले आणि त्याला इराणकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामुळे संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. गेल्या अकरा दिवसांपासून या प्रदेशातील तणाव शिगेला पोहोचला असून, इराणकडून खाडी देशांमध्ये असलेल्या अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत.दरम्यान, शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक मार्गाने चर्चा करण्याचे प्रयत्न झाले, मात्र इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेसोबत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. त्यांच्या मते, अमेरिकेसोबत झालेल्या मागील चर्चांमध्ये विश्वासघात झाला असून वारंवार झालेल्या हल्ल्यांमुळे आता कूटनीतीसाठी कोणतीही शक्यता उरलेली नाही.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अराघची म्हणाले की, इराणने मागील वर्षी जून महिन्यात अमेरिकेसोबत चर्चा केली होती; मात्र चर्चा सुरू असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी पुढे सांगितले की, यावर्षीदेखील अमेरिकेने हल्ला होणार नसल्याचे आश्वासन दिले होते आणि अणु प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघेल असे म्हटले होते, तरीही अमेरिकेने आक्रमण केले. त्यामुळे आता अमेरिकेसोबत चर्चा करणे त्यांच्या प्राधान्यक्रमात नाही.यावेळी इराणमध्ये नुकत्याच झालेल्या नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या निवडीला अराघची यांनी स्थैर्याचे संकेत असल्याचे म्हटले. नव्या नेत्यांच्या धोरणांची दिशा हळूहळू स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
अराघची म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायल यांनी जलद विजय मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. काही दिवसांत सत्तांतर घडवून आणता येईल किंवा जलद विजय मिळेल, असा त्यांचा अंदाज होता; परंतु त्यांना यश आले नाही.जागतिक तेलपुरवठा आणि वाढत्या तेलदरांसाठी इराणला जबाबदार धरण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, ही इराणची योजना नाही. तेल उत्पादन आणि वाहतुकीत निर्माण झालेला अडथळा हा अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे झाला आहे. त्यामुळेच होर्मुज सामुद्रधुनी परिसरात जहाजांना सुरक्षित वाटत नाही. मुलाखतीदरम्यान अराघची यांनी मिनाब येथे मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात १७० हून अधिक लोकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार ठरवले. त्यांच्या मते, हा हल्ला अमेरिकन क्षेपणास्त्रामुळे झाला. इराणच्या लष्करी कारवाईला त्यांनी आत्मसंरक्षण असल्याचे सांगितले.
हे युद्ध इराणवर लादण्यात आले असून देशातील नागरिक आणि संसाधनांचे संरक्षण करण्यासाठीच इराण प्रत्युत्तर देत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या लोकांच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी जितका काळ आवश्यक असेल तितका काळ क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवले जातील, असेही त्यांनी पुन्हा ठामपणे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode