देशात इलेक्ट्रिक कार विक्रीत ४४ टक्क्यांची वाढ
मुंबई, 11 मार्च (हिं.स.)। भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल झपाट्याने वाढताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत. यामुळे देशातील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्या
India 44 percent increase EV car sales


मुंबई, 11 मार्च (हिं.स.)। भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल झपाट्याने वाढताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय स्वीकारत आहेत. यामुळे देशातील इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (एफएडीए) च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री वार्षिक आधारावर ४४ टक्क्यांनी वाढून १३,७३३ युनिटपर्यंत पोहोचली आहे.

मात्र जानेवारी २०२६ च्या तुलनेत विक्रीत घट झाल्याचेही दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात १८,४७० इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या होत्या, तर फेब्रुवारीमध्ये हा आकडा १३,७३३ युनिटवर आला. जानेवारीनंतर साधारणपणे वाहनांच्या मागणीत होणारी घट आणि फेब्रुवारी हा कमी दिवसांचा महिना असणे ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये फेब्रुवारी २०२६ मध्येही टाटा मोटर्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. कंपनीने या महिन्यात एकूण ५,५६८ इलेक्ट्रिक कारची विक्री केली. मागील वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये कंपनीने ४,०२० युनिट विक्री केली होती. त्यामुळे यंदा विक्रीत सुमारे ३८.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र जानेवारी २०२६ मध्ये कंपनीने ८,००७ युनिट विक्री केली होती. त्यामुळे महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये सुमारे ३० टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

इलेक्ट्रिक कार बाजारात महिंद्रा कंपनीने सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये कंपनीने २,९१३ इलेक्ट्रिक कारची विक्री केली. मागील वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा केवळ ५०८ युनिट होता. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत तब्बल ४७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र जानेवारी २०२६ च्या तुलनेत विक्रीत सुमारे २० टक्क्यांची घटही नोंदवली गेली आहे.

इलेक्ट्रिक कार विक्रीच्या बाबतीत JSW MG Motor India दुसऱ्या स्थानावर राहिली. कंपनीने फेब्रुवारी २०२६ मध्ये ३,३१२ युनिट विक्री केली. मात्र ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. तसेच जानेवारीच्या तुलनेत सुमारे २९ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

इतर कंपन्यांच्या कामगिरीकडे पाहिले असता, व्हिएतनामची VinFast कंपनीने फेब्रुवारीमध्ये ३८४ इलेक्ट्रिक कार विकल्या. चीनची BYD कंपनीने ३०६ युनिट विक्री करत वार्षिक आणि मासिक दोन्ही आधारांवर वाढ नोंदवली आहे. याशिवाय ह्युंदाई मोटर कंपनीने फेब्रुवारीमध्ये ३०४ इलेक्ट्रिक कारची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. तर Kia कंपनीने २९५ युनिट विक्री करत चांगली वाढ नोंदवली आहे.

लक्झरी सेगमेंटमध्ये बीएमडब्ल्यूने २४५ आणि मर्सिडीज-बेंझने ६५ इलेक्ट्रिक कार विकल्या. याशिवाय मारुती सुझुकीने २१४, टेस्लाने २९ आणि व्होल्वो कार्सने २५ इलेक्ट्रिक कारची विक्री नोंदवली आहे. एकूणच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याचे हे आकडे स्पष्ट दर्शवतात. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन योजनांमुळे आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळातही इलेक्ट्रिक कार बाजारात वेगाने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande