
त्रंबकेश्वर, 11 मार्च (हिं.स.)।त्र्यंबकेश्वर येथे ११०० कोटी रुपये खर्चुन गोदावरी नदीपात्रा लगत शासनाने घाट बांधणी सुरू केली आहे. तथापि अखिल भारतीय उदासीन निर्मल परिषदेने याला तीव्र आक्षेप घेत शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा खंडित करणार नसल्याचे सांगत शाहीमार्गात बदल आणि अमृतस्नानाच्या जागेत कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही, असा कडक इशारा परिषदेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे पत्र सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले.
बडा उदसीन आखाड्याचे अध्यक्ष श्री महंत दुर्गादास महाराज यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीला बांधण्यात येणाऱ्या घाटांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने नव्याने घाट बांधून तेथे अमृतस्नान करण्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे. भाविकांमध्ये गैरसमज पसरण्याची शक्यता असते. अमृतस्नानादरम्यान भाविक भ्रमीत होतील आणि त्यामुळे भाविकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचा परिणाम धावपळ होऊन चेंगराचेंगरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रयागराज येथे घडलेली दुर्दैवी घटना शासनाच्या अशाच संभ्रमीत करणाऱ्या निर्णयामुळे झाल्याचे स्पष्ट केले. आखड्यांचे साधूशास साधू शासनाकडून पैसे घेतात, अशी संभ्रम निर्माण करणारी करणारी चर्चा काही दांभिक लोक पसरवत आहेत. आखाडे शासनाकडून कधीही पैसे घेत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्र्यंबकेश्वर येथे सर्व तीनआख्याड्यांच्या महंतांच्या उपस्थितीत आयुक्त सिंह यांना पत्र देण्यात आले. कुशावर्तावर अमृतस्नान होईल, अमृतस्नानाचा आणि पेशवाईचा मार्ग परंपरागत असेल, दोन उदासीन व एक निर्मल या तीन आखाड्यांच्या शाही मार्गाची जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी साधूंसमवेत पाहणी करावी मिरवणुकीत रथ आणि वाहनांचा समावेश असल्याने त्याला अडथळा होणार नाही, असे नियोजन करावे, अशी मागणी श्री महंत दुर्गादास यांनी केली. आखाड्यातून कुशावर्त तेथून मंदिरात व परत आखाड्यात जाण्याचे मार्ग यात कोणताही बदल होणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. यावेळी बडा उदासीन आखाडा अध्यक्ष श्री महंत दुर्गादास महाराज, श्री महंत रामनवमीदास महाराज, सचिव हंस मुनी, महंत शिवानंद महाराज, मुकामी महंत दानमुनी, गोपालदास, इंदलदास आदींसह साधू-महंत उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV