
तेहरान, ११ मार्च (हिं.स.) : मध्यपूर्व आशियातील सुरू असलेला संघर्ष आता १२व्या दिवशी पोहोचला असून परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत आहे. दरम्यान, इराणने इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये सलग अनेक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित होताना दिसत असून काही वेळातच जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत.
इराणचा दावा आहे की हा हल्ला इस्रायलविरुद्ध दिलेले थेट प्रत्युत्तर आहे. मात्र या क्षेपणास्त्रांचे अचूक लक्ष्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. युद्ध सुरू झाल्यापासून इराणकडून इस्रायलवर सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले केले जात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इस्रायलमधील एक महत्त्वाचे संप्रेषण आणि गुप्तचर केंद्र पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. तेल अवीवच्या दक्षिणेकडील हाइला परिसरात असलेल्या सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटरवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या माहितीनुसार, या हल्ल्यात केंद्राचा कंट्रोल रूम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
दुसरीकडे इस्रायलनेही हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. इस्रायली सैन्याने इराणसोबतच लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. लेबनॉनची राजधानी बेरूत येथे हिजबुल्लाहच्या आर्थिक शाखा ‘अल-करद-अल-हसन’ला लक्ष्य करण्यात आले. हे ठिकाण बेरूतच्या दक्षिण भागात असल्याचे सांगितले जाते.इस्रायलचा दावा आहे की हवाई हल्ल्यांसोबतच जमिनीवरील सैन्यदलही हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये इस्रायली सैनिकांना लक्ष्य करत रॉकेट हल्ले केल्याचे म्हटले आहे.
इराणमध्येही हल्ले सुरूच आहेत. इस्रायल आणि अमेरिकन सैन्य इराणच्या तेल डेपो आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत असल्याचे सांगितले जाते. ताज्या हल्ल्यात तेहरानमधील आणखी एका ऑइल डेपोवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर डेपोमधून उठणारा काळा धूर दूरवरून दिसत होता. याआधी झालेल्या हल्ल्यानंतर अनेक दिवस आग लागलेली होती.इराणच्या बोनाब शहरातील पोलीस मुख्यालयावरही सलग तीन जोरदार हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट इतके तीव्र होते की त्यांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. मात्र जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
हल्ल्यांनंतर समोर आलेल्या सॅटेलाइट चित्रांमध्ये इस्फहानमधील खातामाई एअरबेस दिसत असून तिथे उभे असलेले जुने एफ-14 टॉमकॅट फायटर जेट्स स्पष्टपणे दिसत आहेत. आजही हे जेट वापरणारा इराण हा जगातील एकमेव देश मानला जातो. १९७० च्या दशकात इराणने अमेरिकेकडून सुमारे ७५ एफ-14 जेट खरेदी केले होते. इस्लामिक क्रांतीनंतर ही विमाने आयआरजीसीच्या ताब्यात गेली. सध्या अमेरिका आणि इस्रायल या जेट्सनाही लक्ष्य करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, इस्फहान येथील इराणच्या अणुऊर्जा केंद्राचीही काही धक्कादायक छायाचित्रे समोर आली आहेत. येथे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून अनेक ठिकाणी बोगदे तयार केले जात आहेत. गेल्या वर्षी या ठिकाणी हल्ला झाला होता. नव्या चित्रांवरून हे केंद्र पुन्हा सक्रिय करण्याचे काम सुरू असल्याचे दिसते. तज्ज्ञांच्या मते, संभाव्य हवाई हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी या संरचना अधिक मजबूत केल्या जात आहेत.------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode