50 वर्षांनंतर अमेरिकेत नवी ऑइल रिफायनरी; टेक्सास प्रकल्पात रिलायन्सची मोठी गुंतवणूक
वॉशिंग्टन , 11 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि ऊर्जा बाजारातील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठ्या ऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिके
50 वर्षांनंतर अमेरिकेत नवी ऑइल रिफायनरी; टेक्सास प्रकल्पात रिलायन्सची मोठी गुंतवणूक


वॉशिंग्टन , 11 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि ऊर्जा बाजारातील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठ्या ऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेत गेल्या 50 वर्षांत प्रथमच नवीन ऑइल रिफायनरी उभारली जाणार आहे. ही रिफायनरी टेक्सासमधील ब्राउन्सव्हिल पोर्ट येथे उभारली जाणार असून, भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजचा या प्रकल्पात मोठा गुंतवणूक सहभाग असेल.

ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही 300 अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक गुंतवणूक असल्याचे सांगितले असून, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक मानला जात आहे. त्यांनी म्हटले की, ही रिफायनरी अमेरिकन बाजाराला इंधन पुरवेल, ऊर्जा उत्पादन वाढवेल आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देईल. तसेच या प्रकल्पामुळे हजारो नवीन रोजगार निर्माण होतील आणि दक्षिण टेक्सास परिसरातील आर्थिक हालचालींना वेग मिळेल.

ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या “अमेरिका फर्स्ट” धोरणाअंतर्गत परवानगी प्रक्रिया सुलभ करणे आणि करांमध्ये कपात केल्यामुळे मोठ्या गुंतवणुकी आकर्षित झाल्या आहेत. त्यांनी असेही सांगितले की, ही नवीन रिफायनरी जगातील सर्वात स्वच्छ रिफायनरींपैकी एक असेल आणि जागतिक ऊर्जा निर्यात वाढवण्यास मदत करेल. या प्रकल्पात गुंतवणूक केल्याबद्दल त्यांनी भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे आभार मानले.

ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणचा संघर्ष तीव्र झाला आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल खाडी प्रदेशातील अनेक देशांमधील अमेरिकन तळ आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेल बाजारावर दबाव वाढला आहे.

जगातील एकूण तेल व्यापाराचा मोठा हिस्सा होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होतो. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे या समुद्री मार्गाच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्था दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, अलीकडे तेल आणि गॅसच्या किमतींमध्ये झालेली वाढ तात्पुरती आहे. त्यांच्या मते, अमेरिकेची लष्करी कारवाई उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर ऊर्जा बाजार स्थिर करण्यात मदत होईल आणि भविष्यात किमती पूर्वीपेक्षा कमी होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेत नवीन रिफायनरी उभारल्यामुळे ऊर्जा उत्पादन वाढेल आणि जागतिक बाजारात तेल पुरवठा स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते. पश्चिम आशियातील युद्ध आणि भू-राजकीय तणावामुळे जगभरातील ऊर्जा बाजार प्रभावित होत असताना हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande