
समालखा, 12 मार्च (हिं.स.) : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज, गुरुवारी पानीपतच्या समालखा येथील माधव सृष्टी केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सकाळी सुमारे 11 वाजता माधव सृष्टी केंद्रात पोहोचले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाइट कॉलेज येथे उतरले. यावेळी भाजप जिलाध्यक्ष दुष्यंत भट्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट माधव सृष्टी केंद्रात गेले. याठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांची सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झालेत. माधव सृष्टी येथे 13 ते 15 मार्च दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार आहे. या तीन दिवसीय वार्षिक बैठकीत देशभरातून सुमारे 1487 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्ष (2025) निमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असून आगामी वर्षासाठी नवीन योजना आणि प्रस्तावांवरही चर्चा केली जाणार आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी