'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६' - डॉ. जब्बार पटेल जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी
मुंबई, 12 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच *''झी चित्रगौरव पुरस्कार २०२६''* . *“मराठी गाजलंच पाहिजे* म्हणत मराठमोळ्या अंदाजात यंदा प्रेक्षकांसमोर येत आहे. संपूर्ण सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा
'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६'


मुंबई, 12 मार्च, (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच *'झी चित्रगौरव पुरस्कार २०२६'* . *“मराठी गाजलंच पाहिजे* म्हणत मराठमोळ्या अंदाजात यंदा प्रेक्षकांसमोर येत आहे. संपूर्ण सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची झलक अनुभवायला मिळणार आहे. झी चित्रगौरवच्या मंचावर मराठी गाजणार, घुमणार मराठीचा हुंकार आणि होणार मराठीचा सन्मान.

यंदाच्या *झी चित्रगौरव २०२६ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरेल ते म्हणजे* *जेष्ठ दिग्दर्शक 'डॉ. जब्बार पटेल'* , कला ही केवळ करमणूक नसते, ती विचारांची धगधगती मशाल असते हे आपल्या प्रत्येक कलाकृतीतून ज्यांनी नेहमी सिध्द केलं, असं आभाळा एवढं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉ. जब्बार पटेल.

पेशाने डॉक्टर असल्यामुळेच आपल्याला प्रेक्षकांची नाडी बरोबर कळली असावी. मराठी रंगभूमीच्या पवित्र परंपरेतून, चित्रपटाच्या विशाल पडद्यापर्यंत आपला प्रवास हा केवळ यशाचा नव्हे; तर धाडस, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीचा आहे. आपण प्रत्येक कलाकृतीतून समाजाशी प्रामाणिक संवाद साधला, अस्वस्थ प्रश्न विचारले आणि प्रेक्षकांच्या मनात विचारांची नवी खिडकी उघडली. ‘सामना’ ह्या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत तुमचं पहिलं पाऊल पडलं आणि सुरु झाला एक वादळी प्रवास. ‘सिंहासन’ या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही सत्तेच्या पडद्यामागचं वास्तव उलगडलं. ‘उंबरठा’ आणि ‘जैत रे जैत’ मधून स्त्रीच्या आत्मसन्मानाला सशक्त आवाज दिला. ‘एक होता विदुषक’ मधून मुखवट्या मागच्या कलाकाराचा चेहरा दाखवलात. ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट इंग्रजी भाषेत सुद्धा करून तुम्ही आपला सिनेमा जगभर पोहचवला. आणि ‘मुक्ता’ सारख्या चित्रपटामधून जागतिक जातीव्यवस्थेबद्दल तुम्ही धाडसी वक्तव्य केलं. काळाच्या पुढचा दिग्दर्शक ही ओळख असलेल्या आपल्या प्रत्येक चित्रपटात एक धाडसी भूमिका, एक जाणीवपूर्वक मांडणी आणि एक स्पष्ट सामाजिक भान जाणवत राहते.

तर *मराठी पाऊल पडते पुढे* या पुरस्काराचे मानकरी ठरले, *अभिनेते, दिग्दर्शक लेखक 'चिन्मय मांडलेकर'* . काही लोक स्वप्नं पाहत नाहीत… ते स्वप्नं जगतात. संकटांना टाळत नाहीत… त्यांना कवटाळतात. आणि नियतीसमोर नतमस्तक होत नाहीत… तर स्वतःची नियती घडवतात. ‘चिन्मय मांडलेकर’ हे त्या जिद्दी स्वप्नाचं नाव! कपड्यांबरोबर कलाकारही घडवणाऱ्या ऐतिहासिक गिरणगावाच्या मातीत जन्मलेला. ज्या वयात मुलांच्या हातात खेळणी दिली जातात त्या वयात तुमच्या हातात पुस्तक देण्यात आलं. कदाचित त्या पुस्तकाच्या पानांतूनच तुमच्यातला लेखक जागा झाला आणि अक्षरांनी तुमच्या भवितव्याची दिशा ठरवली. कॉलेजमधील नाटकांत गर्दीतल्या छोट्या भूमिका करणारा हा तरुण, गर्दीचा भाग न राहता हळूहळू स्वतःभोवती गर्दी जमवू लागला आणि मराठी रंगभूमी व चित्रसृष्टीला लाभला एक नवा, अभ्यासू आणि संयमी नायक.

शब्दांवर प्रभुत्व, संवादातली धार, नजरेतला भेदकपणा आणि शांत स्वभावातला ठामपणा यानं प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घातली. ‘मोरया’ आणि ‘झेंडा’ मधील तरुण कार्यकर्त्यापासून , ‘हलाल’, ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ मधील आव्हानात्मक भूमिका स्वीकारत, तुम्ही स्वतःमधील अभिनेत्याला सतत नवे आव्हान दिले... छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं आणि तितक्याच जबादारीने तुम्ही ती जगलात. अभिनयाबरोबर तुमच्यातला लेखक नवनवे प्रयोग करत राहिला. ‘इंस्पेक्टर झेंडे’ ह्या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून तोच लेखक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मनोज वाजपेयी ह्यांच्यासारख्या कसलेल्या कलाकाराबरोबर काम करताना, चित्रपट जरी हिंदी असला तरी आपल्या दिग्गज मराठी कलाकारांना घेऊन आपण तो साकारलात. ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

*तेव्हा पाहायला विसरू नका 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' १४ मार्च संध्या ७ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.*

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande