
मविप्रच्या महानोकरी मेळाव्यात १० हजारांहून अधिक उमेदवारांची नोंदणी
नाशिक, 13 मार्च (हिं.स.)।
: आजच्या युवावर्गासमोर शिक्षण असले तरी नोकरीची मोठी समस्या आणि चिंता आहे. समाजात आयटीआय, विविध डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून, त्यांच्या समोर नोकरीचा मोठा प्रश्न उभा आहे. नोकरी मेळाव्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळणार आहेच, शिवाय मुलाखतीच्या प्रक्रियेतून त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे. विविध कंपन्या विद्यार्थ्यांना केवळ रोजगार देत नाहीत, तर प्रशिक्षणही देणार आहेत. आगामी काळात २५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालय, नाशिक आणि सीआयआय मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने , आयोजित महानोकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, प्रा. शशिकांत मोगल, प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे, प्राचार्य प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.मविप्र संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या दृष्टीने वणी, दिंडोरी, नांदगाव आणि देवळाली कॅम्प येथे नोकरी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. आजच्या या महानोकरी मेळाव्यात जिल्ह्यातून दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV